अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांची घोषणा
वारणानगर/ प्रतिनिधी
ऐन उन्हाळ्यात पशूखाद्य व चाऱ्याची टंचाई,वाढलेले दर या पार्श्वभूमीवर वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दूधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ देण्याची घोषणा अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली जिल्हयातील इतर दूध संघानी म्हैस दूधास दरवाढ दिल्यास वारणा ही मागे राहणार नाही मात्र दरवाढ न झाल्यास सालाबादप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या म्हैशीच्या दुधास प्रतिलिटर फरक वाढवून देण्याचे आश्वासनही कोरे यांनी यावेळी दिले.
अध्यक्ष डॉ.कोरे म्हणाले, उन्हाळ्यात दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यातच पशूखाद्याचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे या पार्श्वभूमीवर वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास ३.५ फॅटला प्रतिलिटर २ रुपये दर वाढवून तो प्रतिलिटर २९ रुपये करण्यात आला आहे त्याचबरोबर म्हैस दुधास सध्या ६.० फॅटला प्रतिलिटर ४१.५० पैसे दर आहे अद्याप जिल्ह्यातील कोणत्याही सहकारी अथवा खाजगी दूध संघानी दरवाढ केलेली नाही ते केल्यास वारणा दरवाढ करण्यास बांधिल आहे दरवाढ झाली नाही तरी सुध्दा दरवर्षी देण्यात येणाऱ्या फरकबीला मध्ये जादाचा प्रतिलिटर फरक देवून शेतकऱ्यांना हातभार लावणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.
वारणा दूध संघाने प्रतिदिनी ४० मे.टन हून अधिक दह्याचे उत्पादन व विक्री केली. याबरोबरच संघाच्या लस्सी, ताक, दूध या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून वारणा श्रीखंडाची या वर्षी पाडव्यापर्यंत विक्रमी विक्री करण्याचा मानस आहे बिहार राज्याच्या मिल्क फेडरेशनला प्रतिदिनी एक लाख लिटर दुधाचा पुरवठा केला जात असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.
दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे महापूर,अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशू वैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच, व रेडी संगोपन या सारखे अनेक उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे श्री. येडूरकर यांनी सांगितले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव,संकलन व्यवस्थापक डॉ.अशोक पाटील, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर,मार्केटिंग
इनचार्ज अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.
गोव्याला ‘वारणा ‘ चे व्यापार संकुल
गोवा राज्यात दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात वारणा ब्रँडची सर्व उत्पादने एकाच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी वारणा व्यापार संकुलाची गोवा येथे लवकरच उभारणी करणार असल्याचे डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.