वाळवा / वार्ताहर
किरकोळ वादातून वाळव्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यामध्ये तलवार हल्ल्यात एक जवानासह दोन्ही गटाचे ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. तर या तुंबळ मारामारीमध्ये जवानाच्या घराची प्रचंड नासधूस करण्यात आली आहे.
वाळवा येथे आज दि. १३ फेब्रुवारी रोजी ९ वा. सकाळी दोन गटात तुंबळ राडादोन गटात तुंबळ हाणामारी झाली, एकमेकांकडे बघण्याचा वादातून हा राडा झाला आहे. गावातील जवान रणजित फाटक आणि शरद अहीर या कुटुंबात ही मारामारी झाली. दोन्ही गटाच्या वीस ते पंचवीस जणांचा जमावामध्ये तूंबळ हाणामारी झाली आहे. अहिर गटाकडून जवान फाटक यांच्या घराची प्रचंड नासधूस करण्यात आलेली आहे.
या मारामारी दरम्यान तलवारींचाही वापर झाला असून, झालेल्या हल्ल्यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये जवान रणजित फाटक, त्याचा भाऊ व वडील यांचाही समावेश आहे. या राड्यामध्ये हवेत गोळीबार झाल्याची अफवा पसरली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमध्ये गोळीबार झाला नसल्याचा दावा पोलिसांच्याकडून करण्यात आलेला आहे. मात्र या राड्यामुळे वाळवामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही गटांनी पोलिसांत एकमेकाविरोधात तक्रार दिली आहे.