प्रतिनिधी /वास्को
एटीएम कक्षातच एका युवकाकडून एटीएम कार्ड हिसकावून पळणाऱया दोघा चोरटय़ांना जमावाने बेदम चोपले. त्यानंतर त्यांना एटीएम कक्षातच बंदीस्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघानाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वास्को शहरातील मुख्य रस्त्यावर बराच वेळ गोंधळ उडाला.
ही घटना काल सोमवारी दुपारी एकच्या सुमारास वास्को शहरातील विद्याधिराज भवनसमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कक्षात घडली. एक वयस्क महिला पैसे काढण्यासाठी या एटीएममध्ये आली होती. तीच्याबरोबर एक युवकही होता. तो युवकच तीला मदत करीत होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तीनी त्या युवकाला हेरले. त्याने पैसे काढण्यासाठी पीन क्रमांक दाबताच तो क्रमांकही त्यांनी टिपून घेतला. त्यानंतर त्या युवकाच्या हातातले एटीएम कार्ड दोघांपैकी एकाने हिसकावले व ते पळत सुटले. त्यामुळे त्या महिलेने व युवकाने आरडाओरड केली. हा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱया एका युवकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इतरानाही समजल्याने इतर लोकही मदतीला धावून आले. त्यामुळे लोकांच्या तावडीतून ते सुटू शकले नाही. लोकांनी त्यांना प्रथम बेदम चोप दिला. त्यानंतर त्या दोघानाही त्याच एटीएम कक्षात डांबून ठेवले.
ही माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी धावून आले. मात्र, त्या दोघाना घेऊन जाण्यासाठी पीसीआर वाहने बरीच उशिरा आले. तोपर्यंत रस्त्यावर लोकांची बरीच गर्दी झाली व गोंधळ उडाला. शेवटी घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या वाहनामध्ये त्या दोघांना घालण्यात आले. त्यानंतर जमाव पांगला. सदर चोरटे परप्रांतीय आहे. एकाचे नाव रवी हुशीयारसिंग(30) तर दुसऱयाचे नाव अंकुर रमेशकुमार(23) असे आहे. पहिला सुलतानपूर नवी दिल्ली येथील तर दुसरा हरयाना राज्यातील आहे. पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करून त्याना अटक केली आहे. चोरीच्या एटीएम कार्डचा वापर करून त्वरीत पैसे काढण्याचा त्यांचा बेत होता.