लोकांमध्ये पसरलेल्या भितीचा परीणाम
प्रतिनिधी / वास्को
वास्को शहर व परीसरात तसेच पंचायत क्षेत्रात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी वास्को शहरात जवळजवळ नव्वद टक्पे व्यवहार बंद होते. पंचायत क्षेत्रातही आवाहनला प्रतिसाद मिळाला आहे. मुरगाव तालुक्यातील चिखली, सांकवाळ, कुठ्ठाळी, कासांवली, वेर्णा, वेलसाव तसेच बोगमाळो पंचायत मंडळानी आपापल्या क्षेत्रात स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर केला होता. काही पालिका प्रभागांमध्येही लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.
वास्को शहरासह संपूर्ण मुरगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने तसेच मृत्यूंची संख्याही धोकादायकरीत्या वाढत असल्याने वास्कोत सध्या भितीचे वातावरण पसलेले आहे. या वातावरणाचा परीणाम लॉकडाऊनमधून दिसून येत आहे. सरकारने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतरही वास्को शहर व परीसरात काही व्यवसायीकांनी स्वताहून आपल्या व्यवसायांवर निर्बंध आणले होते. त्यामुळे सोमवारपासून वास्कोत पूर्णपणे बंद नसला तरी अनेक व्यवहार ठप्पच होते. मंगळवारी सरकारने केवळ जीवनावश्यक व्यवहार खुले ठेवावेत असे आवाहन जनतेला केल्याने काल बुधवारी वास्कोतील दैनंदिन व्यापारावर बराच परीणाम दिसून आला. वास्को शहरात सकाळी काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. मात्र, काही वेळाने त्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. नगरपालिका मार्केट बंद होते. केवळ भाजी मार्केट तसेच मासळी मार्केट खुले होते. हॉटेल्स व रेस्टारन्ट केवळ पार्सल सेवे पुरतीच खुली होती. प्रवासी बस वाहतुक मर्यादीत स्वरूपात सुरू होती. भुसारी व किराणा दुकाने, खासगी कार्यालये व बँकांचा व्यवहार सुरळीत होता. फार्मसीही खुल्या होत्या. मात्र, शहरातील व्यवहार जवळपास नव्वद टक्के बंदच होते. शहरातील व्यवहार ठप्प असताना वास्को शहरात लोकांची व वाहतुकीची वर्दळ मात्र जास्त होती. संध्याकाळी भाजी मार्केटातही गर्दी होती. शहर व परीसरातील आर्थिक व्यवहार बंद असले तरीही लोकांची दाट वर्दळ खटकणारी होती.
पंचायत क्षेत्रात आणि पालिका प्रभागांमध्येही लॉकडाऊनला प्रतिसाद
चिखली, सांकवाळ, बोगमाळो, वेलसाव, कासावली, वेर्णा, कुठ्ठाळी अशा पंचायत क्षेत्रातही लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंचायतीनीच हा निर्णय स्वेच्छा घेतलेला आहे. पंचायतीनी केलेल्या आवाहनाला पंचायत क्षेत्रातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही क्षेत्रांमध्ये सकाळी काही वेळ किराणा व इतर जीवनाश्यक सेवा खुल्या होत्या. नंतर त्या बंद करण्यात आल्या. काही पंचायतींनी सात दिवस तर काही पंचायतींने दहा दिवस लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. मुरगावच्या पालिका प्रभाग 21, 22, 23 व 24 या प्रभागांमध्येही स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहे. लोकांचा नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. नगरसेवक सुदेश भोसले यांनी बुधवारपासून सुरू झालेल्या मुरगावच्या वाडे व नवेवाडे भागातील चार प्रभागातील लॉकडाऊनला शंभर पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट करून स्थानिक लोकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी असेच सहकार्य करावे. नगरसेवकांनी व लोकांनी सुरू केलेल्या या मोहिमेला प्रशासनाकडूनही सहकार्य मिळत असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.
काही लोकांचा बिनधास्त संचार, कंटेन्मेन्ट झोन नसल्याने खबरदारीकडेही दुर्लक्ष
दरम्यान, वास्को शहर व परीसरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होणाऱया बरोबरच मृतांच्या संख्येतही धक्कादायक वाढ होत आहे. कोरोनाने निर्माण केलेल्या संकटामुळे सध्या चिंता पसरलेली आहे. धोका वाढत असला तरी या दुसऱया लाटेच्या वेळी प्रशासनाने कंटेन्मेंट झोन वगैर जाहीर करण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे कुठल्या भागात किती रूग्ण आहेत याचा नागरीकांना पत्ता लागत नाही. तसेच मुरगाव तालुक्यातील वास्कोसह कुठल्या भागातील लोकांचे कोरोनामुळे किती बळी गेले याचाही पत्ता लागत नाही. त्यामुळे खबरदारीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यातून कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. शहर व परीसरातील आर्थिक व्यवहार बंद असूनही लोकांचे नाहक फिरणे बंद झालेले नाही. वास्को शहराबरोबरच मांगोरहिल सारख्या भागात लोकांचा दाटीवाटीने संचार होत असून कोरोनाचा धसका घेतलेल्या लोकांमध्ये अशा प्रकारामुळे चिंता व्यक्त होत आहे. काल बुधवारी वास्को शहर क्षेत्रात 797 कोरोना बाधीतांची नोंद झाली होती. कासावली सारख्या ग्रामीण क्षेत्रात 1146 तर कुठ्ठाळी, सांकवाळ व झुआरी तसेच चिखली व बोगमाळो पंचायत क्षेत्रात 1317 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. मुरगाव तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा 3260 ऐवढा झालेला आहे.