24 लाख 60 हजार रुपये किमतीची वाहने जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
वाहने चोरून त्यांची विक्री करत असल्याची माहिती सीईएन पोलिसांना समजली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी वाहने चोरणाऱया त्रिकुटाला अटक करून त्यांच्याकडून तब्बल 24 लाख 60 हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत. सीईएन विभागातील पोलीस अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
वासुदेव सहदेव नायक (वय 34, रा. खनदाळ, ता. रायबाग), महांतेश यल्लाप्पा करगण्णी (वय 34, रा. खानट्टी, ता. मुडलगी), विवेकानंद चौडय्या तळवार (वय 20, रा. राजापूर, ता. मुडलगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटप्रभा-राजापूर हद्दीत दुसऱयांना हे तिघे जण चेसी क्रमांक व इंजिन क्रमांक बदलून वाहने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी आणि त्यांच्या सहकाऱयांनी धाड टाकून ही कारवाई केली. या आरोपींकडून 12 चाकी गुड्स ट्रक, महेंद्रा बोलेरो पिकअप गुड्स वाहन, महेंद्रा बोलेरो जीप आणि महेंद्रा स्कॉर्पिओ जप्त केली आहेत. हे तिघे आरोपी बेंगळूर, हुबळी येथून या वाहनांची चोरी करत होते.
चोरी केल्यानंतर वाहनाचा चेसी क्रमांक व इंजिन क्रमांक बदलायचा, त्यानंतर बोगस कागदपत्रे तयार करायची आणि ती वाहने विक्री करायची. घटप्रभा परिसरातही त्यांनी वाहनांची चोरी केली होती. या प्रकरणी घटप्रभा पोलीस स्थानकात फिर्यादही दाखल झाली होती. वासुदेव, महांतेश, विवेकानंद हे वाहने विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
या कारवाईत सीईएन ठाण्यातील पोलीस अधिकारी अशोक एच. बजंत्री, एएसआय जे. सी. हेगडे, एएसआय के. आर. इमामण्णावर, एएसआय बी. एस. चिन्नीकुप्पी, वाय. व्ही. सप्तसागर, एल. एन. कुंभारे, एस. आर. माळगी, एस. सी. अंबरशेट्टी, टी. एस. केळगेरी, एम. बी. कांबळे, एन. एल. गुडेण्णावर, व्ही. आय. नाईक, एस. ए. बेवनूर, जी. एस. लमाणी, ओ. नागराज, डी. के. दयण्णावर, सविता पाटील आणि जीप चालक सुनील कांबळे यांनी भाग घेतला आहे.