सलग दुसऱया दिवशी घसरण ः जागतिक बाजारात मिळता-जुळता कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशीच्या सत्रात भारतीय भांडवली बाजार सलग दुसरी घसरण नेंदवत बंद झाला आहे. यामध्ये विविध घडमोडींचा परिणाम झाल्याचे दिसून प्रामुख्याने जागतिक बाजारातील मिळता-जुळता राहिलेला कल व वाहन आणि आर्थिक क्षेत्रातील विक्रीच्या माऱयामुळे बाजार घसरण नोंदवत बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीमध्ये सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तेजीत राहिला होता, परंतु अंतिम क्षणी बाजार आपली तेजी कायम ठेवण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. दिवसअखेर सेन्सेक्स 87.12 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 61,663.48 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 36.25 अंकांनी घसरुन निर्देशांक 18,307.65 वर बंद झाला आहे. काहीवेळ सेन्सेक्स 413.17 अंकांनी नुकसानीत राहिला होता.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक, भारतीय स्टेट बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग वाढीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी लाभासह बंद झाला आहे. युरोपीयन बाजार सुरुवातीला सकारात्मक कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.40 टक्क्यांच्या वाढीसोबत 90.09 डॉलर प्रति बॅरेल राहिले.
या सर्व घडामोडींसोबत आठवडय़ाची समाप्ती झाली असली तरी आगामी आठवडय़ात भारतीय शेअर बाजार कोणता कल प्राप्त करणार हे पाहणे महत्त्वाचे असून यामध्ये जागतिक व स्थानिक पातळीवरील घडामोडी कशा असतील यावर बाजाराची दिशा निश्चित होणार आहे.