सलग तिसऱया पराभवामुळे बांगलादेशचे आव्हान जवळपास संपुष्टात
शारजाह / वृत्तसंस्था
आंद्रे रसेलच्या शेवटच्या षटकातील शिस्तबद्ध माऱयामुळे विद्यमान विजेत्या विंडीजने आयसीसी टी-20 विश्वचषक सुपर-12 लढतीत बांगलादेशविरुद्ध अवघ्या 3 धावांनी निसटता विजय संपादन केला. शेवटच्या चेंडूवर चौकाराची आवश्यकता असताना प्रतिस्पर्धी कर्णधार महमुदुल्लाहला रसेलच्या आऊटसाईड ऑफ स्टम्प माऱयावर केवळ एकच धाव घेता आली. या लढतीत विंडीजने 20 षटकात 7 बाद 142 धावा केल्या तर प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकात 5 बाद 139 धावांवर समाधान मानावे लागले.
या विश्वचषक स्पर्धेत सलग तिसऱयांदा प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या विंडीजने 142 धावांपर्यंत मजल मारली, त्यावेळी सामनावीर निकोलस पूरनची 22 चेंडूतील 40 धावांची जलद खेळी वैशिष्टपूर्ण ठरली. टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया रोस्टन चेसने 39 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात विंडीजच्या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केल्यानंतर बांगलादेशच्या पदरी निराशा आली.
बांगलादेशचा सलग तिसरा पराभव
सुपर-12 फेरीतील आतापर्यंत खेळलेल्या 3 लढतीत एकही गुण मिळवता न आल्याने बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. विंडीजला मात्र उर्वरित सर्व सामने जिंकत उपांत्य फेरी गाठण्याची अद्यापही आशा आहे.
विजयासाठी 143 धावांचे आव्हान असताना मोहम्मद नईम (17) व शकीब हसन (9) हे बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. केवळ यष्टीरक्षक-फलंदाज लिटॉन दासच्या (43 चेंडूत 44) संयमी फलंदाजीमुळेच बांगलादेशला शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी प्रयत्न करता आले.
बांगलादेशप्रमाणेच विंडीजचे क्षेत्ररक्षणही खराब स्वरुपाचे राहिले आणि त्यांनी किमान 3 वेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावचीत करण्याची संधी गमावली. शेवटच्या 6 षटकात 50 धावांची आवश्यकता असताना त्यांचे 6 फलंदाज हाताशी होते. कर्णधार महमुदुल्लाह व लिटॉन दास एकेरी धावेचे दुहेरी धावांमध्ये रुपांतर करत असल्याने बांगलादेशचा वरचष्मा होता. मात्र, 17 व्या षटकात डेव्हॉन ब्रेव्होने (1-36) केवळ 3 धावा दिल्या आणि तेथून या सामन्याचे चित्र बदलत गेले.
वास्तविक, बेव्होच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर महमुदुल्लाहने सणसणीत षटकार खेचला होता. पण, शेवटच्या चेंडूवर ब्रेव्होने डेंजरमन दासला बाद करत विंडीजला पुन्हा पंटफुटवर आणले. डावातील शेवटच्या षटकात निर्णायक क्षणी महमुदुल्लाह अपयशी ठरला आणि बांगलादेशला पराभवाला सामोरे जावे लागले.
पूरन-चेसची फटकेबाजी
तत्पूर्वी, निकोलस पूरन व रोस्टन चेस यांच्या फटकेबाजीमुळे विंडीजला 20 षटकात 7 बाद 142 धावांची मजल गाठता आली. विंडीजचे फलंदाज फिरकी गोलंदाज सफाईने खेळू शकत नाहीत, हा इतिहास पाहता बांगलादेशने फिरकी गोलंदाजांवर अधिक भर दिला आणि यामुळे विंडीजला पॉवर प्लेच्या 6 षटकात 2 बाद 29 धावांवर समाधान मानावे लागले होते. नंतर डावातील उत्तरार्धात चेस व पूरनच्या फटकेबाजीमुळे विंडीजला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.
संक्षिप्त धावफलक
विंडीज ः 20 षटकात 7 बाद 142 (निकोलस पूरन 22 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह 40, रोस्टन चेस 46 चेंडूत 2 चौकारांसह 39, पोलार्ड नाबाद 14, होल्डर 5 चेंडूत नाबाद 15. अवांतर 14. मेहदी हसन, मुस्तफिजूर रहमान, शोरिफूल इस्लाम प्रत्येकी 2 बळी).
बांगलादेश ः 20 षटकात 5 बाद 139 (लिटॉन दास 43 चेंडूत 4 चौकारांसह 44, महमुदुल्लाह 24 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 31. अवांतर 11. रवी रामपॉल, होल्डर, रसेल, होसेन, डेव्हॉन ब्रेव्हो प्रत्येकी 1 बळी).
शेवटच्या षटकात काय घडले?
विजयासाठी 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया बांगलादेशला डावातील शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. कर्णधार महमुदुल्लाह जिद्दीने लढत असल्याने त्यांना विजय खेचून आणण्याची अपेक्षा होती. मात्र, शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना महमुदुल्लाहला निर्णायक क्षणी चौकार फटकावण्याचे आव्हान पेलवले नाही आणि बांगलादेशचा संघ 3 धावांच्या निसटत्या फरकाने पराभूत झाला.