वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल. या सामन्यात दोन्ही संघांकडून जोरदार फटकेबाजीची अपेक्षा आहे.
या स्पर्धेत झालेल्या पहिल्या सामन्यात विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांना पराभव पत्करावा लागले. या दोन्ही संघांची पहिल्या सामन्यातील फलंदाजी दर्जाहीन झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 5 गडय़ांनी तर इंग्लंडने विंडीजचा सहा गडय़ांनी पराभव केला.
इंग्लंडविरूद्ध सामन्यात विंडीजचे फलंदाज केवळ 55 धावांत तंबूत परतले तर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 118 धावा जमविल्या होत्या. मंगळवारच्या सामन्यात दोन्ही संघ आपल्या फलंदाजीत सुधारणा करतील, अशी आशा आहे. दक्षिण आफ्रिका संघात रबाडा, नोर्त्झे, एन्गिडी, केशव महाराज, शम्सी हे दर्जेदार गोलंदाज आहेत. कर्णधार बवूमा, डी कॉक, हेन्रिक्स, मार्करम, क्लासन, मिलर यांच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचे यश अवलंबून राहील.
विंडीज संघामध्ये आक्रमक-स्फोटक फलंदाजांचा समावेश असला तरी इंग्लंडविरूद्ध लढतीत या फलंदाजांनी साफ निराशा केली. कर्णधार पोलार्ड, पुरन, चेस, गेल, हेतमेयर, लेवीस, सिमॉन्स, ब्रॅव्हो हे वेंडीज संघातील प्रमुख फलंदाज आहेत. अखिल हुसेन, पोलार्ड, रामपाल, ब्रॅव्हो, थॉमस यांची गोलंदाजी प्रभावी होणे जरूरीचे आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या स्थितीमध्ये फारसा फरक नसल्याचे जाणवते. पण, विंडीजच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निश्तिच वरचढ वाटते. ख्रिस गेल सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरूद्ध विंडीजचे फलंदाज केवळ चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. या सामन्यातही नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकेल.