वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीजचा माजी कर्णधार रामनरेश सरवानची निवड समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट विंडीजने केली. विंडीजच्या वरिष्ठ आणि युवा पुरूष संघांची निवड करणाऱया निवड समिती अध्यक्षपदी डेस्माँड हेन्सची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली असून रॉबर्ट हेन्स सदस्य आहेत.
माजी कर्णधार रामनरेश सरवानने तब्बल 10 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना विंडीज संघाचे नेतृत्व भूषवले आहे. विंडीज क्रिकेट मंडळाच्या बैठकीमध्ये सरवानकडे सदस्यपद सोपविण्याचा निर्णय घेतला.
सरवान हा गयाना क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष असून तो हे पद लवकरच सोडणार आहे. 30 जून 2024 पर्यंत सरवानकडे निवड समिती सदस्यपद राहील. सरवानने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 81 कसोटी, 181 वनडे आणि 18 टी-20 सामन्यात 2000 ते 2013 या कालावधीत विंडीजचे प्रतिनिधीत्व केले. कसोटीत त्याने 5842 धावा जमविल्या असून त्यामध्ये 15 शतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये त्याने पाच शतकांसह 5804 धावा जमविल्या आहेत. 2004 साली आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱया विंडीज संघामध्ये सरवानचा समावेश होता.