काश्मीर हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध तर उत्तर भारतील अनेक स्थळे धार्मिक पर्यटनासाठी लोकप्रिय असतात असा अनुभव आहे. सध्या पर्यटन मोसमाचा प्रारंभ झाल्याने विविध पर्यटन प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. याच मालिकेत उत्तर प्रदेशातील विंध्य पर्यटन प्रदेशाचा विकास करण्यात येत आहे.
331 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामाचा नोव्हेंबर 2020 मध्ये प्रारंभ करण्यात आला. तो ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. या भागात मां विध्यवासिनी या देवतेचे ऐतिहासिक मंदीर आहे. या मंदीराच्याच आधाराने आणि त्याच्या अवती भोवती हा प्रकल्प आकाराला येत आहे. त्याच्या अंतर्गत या मंदिराचा पूर्ण कायापालट करण्यात येणार असून ऑक्टोबर 2021 नंतर येथे जेव्हा भाविक लोक धार्मिक पर्यटनासाठी येतील तेव्हा त्यांना हे मंदीर ओळखूही येणार नाही, अशा पद्धतीने त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशात भाविक प्रामुख्याने गंगामातेच्या दर्शनासाठी येतात. गंगा ही भारतीयांसाठी केवळ नदी नसून देवतासमान आहे. त्यामुळे गंगादर्शन करणे हे प्रत्येक हिंदू भाविकाचे ध्येय असतेच. हे लक्षात घेऊन मां विंध्यवासिनीच्या नूतन भव्य मंदीरातून गंगादर्शन होईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. परिणामी. एकाच वेळी, एकाच क्षणी मां विध्यवासिनी आणि गंगामाता दर्शनाचा ‘दुग्धशर्करा’ योग भाविकांना अनुभवावयास मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.