भुरुणकी ग्रा. पं. चे जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील भुरुणकी ग्राम पंचायतीच्या विकासकामात आपण युटय़ुब चॅनेलचा पत्रकार आहे, असे भासवून अडथळे आणणाऱया तथाकथित पत्रकारावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भुरुणकी ग्रा.पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर 9 सदस्यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर केले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, भुरुणकी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील मास्केनहट्टी गावचे जोतिबा भेंडिगेरी, परशुराम कोलकार हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून भुरुणकी ग्राम पंचायत कार्यालयात येऊन आपण पत्रकार आहोत, आम्हाला योग्य ती माहिती द्या, नाहीतर तुम्हाला काय ते दाखवतो, असे धमकावत आहेत. त्यांच्या धमकावण्यामुळे भुरुणकी ग्रा. पं. मधील दोन-तीन पंचायत विकास अधिकाऱयांना आपली बदलीही करून घेतली आहे. काही दिवसापूर्वी जोतिबा भेंडिगेरी यांना यासंदर्भात जाब विचारला असता त्यांनी माफी मागून यापुढे आपण पंचायतीला विनाकारण त्रास देणार नाही, असे मोबाईलवरून सर्वांच्या समक्ष जाहीर केले. पण तरीदेखील त्यांनी विनाकारण त्रास देणे सुरूच ठेवले आहे. तुम्ही अमूक एवढे पैसे द्या, नाहीतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱयांकडे तक्रार करू, असे पुन्हा पुन्हा धमकी देत आहेत. तसेच त्यांनी पंधरा वित्त आयोग योजना कामांसाठी आणलेली खडी, वाळू यासारखे साहित्यही परस्पर लाटले आहे. तसेच मला रोजगार द्या, किंवा माझ्या नावाने हजेरी भरा, हजेरी भरल्या नाही तर मी बघून घेतो, असे म्हणत दररोज त्रास देत आहे. यासंदर्भात त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील ते ऐकायला तयार नाहीत, यामुळे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर ग्रा. पं. अध्यक्ष मुबारक कित्तूर, उपाध्यक्षा विद्या पाटील तसेच सदस्य एम. एम. सावकार, मल्लाप्पा तळवार, विठ्ठल सागरेकर, शोभा गोसबाळ, श्रीदेवी बडगेर, गीता कोलकार, गीता शेंदोळकर, बेबीजान पाटील, मंजुळा दोड्डमणी यांच्या सहय़ा आहेत. या निवेदनाचा अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वीकार केला. व संबंधित तथाकथित पत्रकारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.