सहा महिन्यातच घरफाळा वसुली शंभर टक्के : आयुक्तांच्या प्रयत्नांना मिळाले यश : 2 कोटी 77 लाखांचा कर जमा
प्रतिनिधी / निपाणी
जिल्हय़ातील मोठी नगरपालिका असलेल्या निपाणी पालिकेत गेल्या काही वर्षात कर वसुलीला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत होता. यंदा मात्र कोरोना काळात आर्थिक फटका बसलेला असतानाही निपाणीकरांनी जबाबदारीचे भान राखत पालिकेला घरफाळा शंभर टक्के दिला आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच सहा महिन्यात शंभर टक्के घरफाळा वसुली झाल्याने ऐन दिवाळीत पालिका प्रशासनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
निपाणी पालिकेला उत्पन्नाच्या प्रमुख साधनांमध्ये घरफाळा व पाणीपट्टीचा समावेश होतो. मात्र दोन वर्षापासून पाणीपट्टी वसुलीचे अधिकार 24 तास पाणी योजनेचे कंत्राटदार जैन इरिगेशनकडे गेल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाला काहीशी कात्री लागली होती. अशातच घरफाळा वसुलीही शंभर टक्के होत नसल्याने कामगारांचे पगार तसेच अन्य मुलभूत सुविधा पुरविताना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन आर्थिक वर्ष प्रारंभ होताच वसुलीचे नेटके नियोजन आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाने केले होते. त्याला शहरवासियांनीही चांगली साथ दिल्यामुळे प्रथमच दोन कोटींवर घरफाळा वसुल करण्यात पालिकेला यश आले आहे.
आर्थिक वर्ष सुरु होताना घरफाळा वसुलीचे 2 कोटी 77 लाख रुपये इतके उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये 2 कोटी 44 लाख रुपये या वर्षातील घरफाळा व 33 लाख रुपये थकीत घरफाळा या रकमेचा समावेश होता. ही सर्व रक्कम वसुल करण्यात पालिकेला यश आले आहे. वसुली करताना नागरिकांना विनवणी करणे, पालिका प्रशासनाच्या अडचणी सांगणे, कामगारांचे थकीत पगार दाखवून कर भरण्यासाठी विनंती करणे तसेच थकीत घरफाळा असलेल्यांना पालिकेतील आवश्यक कागदपत्रे ही फाळा भरल्यानंतरच देणे आदी विविध उपाययोजना राबवल्यामुळे घरफाळा वसुली शंभर टक्के करण्यात यश आले.
घरफाळाबरोबरच व्यावसायिक गाळय़ांचे भाडे, विविध परवाना शुल्क यासह विविध करांची वसुलीही 100 टक्के पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. घरफाळा भरुन शहरवासियांनी पालिका प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे. त्या बदल्यात पालिकेनेही आवश्यक मुलभूत सुविधा नागरिकांना तात्काळ पुरविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.