कोपा अमेरिका फुटबॉल- अर्जेन्टिनाची बोलिव्हियावर एकतर्फी मात, उरुग्वेचा पराग्वेवर एकमेव गोलने विजय
वृत्तसंस्था/ कुयाबा, ब्राझील
कोपा अमेरिका स्पर्धेतील सामन्यात अर्जेन्टिनाच्या लायोनेल मेसीने दोन गोल नोंदवत विक्रमी 148 वा आंतरराष्ट्रीय सामना साजरा केला. त्याच्या या कामगिरीमुळे अर्जेन्टिनाने बोलिव्हियावर 4-1 असा एकतर्फी विजय मिळवित गट अ मध्ये अग्रस्थान मिळविले. अन्य एका सामन्यात उरुग्वेने पराग्वेचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेची लढत कोलंबियाविरुद्ध होणार आहे.
गेल्या आठवडय़ात 147 वा सामना खेळत मेसीने जेव्हियर मास्चेरानोच्या सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती आणि सोमवारी बोलिव्हियाविरुद्धच्या सामन्यात दोन गोल नोंदवून त्याने नवा विक्रम साजरा केला. त्याने संघाचा पहिला गोल नोंदवण्यासाठी मदत केली आणि नंतर स्वतः दोन गोल नोंदवले. त्याचे आता एकूण 75 आंतरराष्ट्रीय गोल झाले असून त्याचा संघ सलग 17 सामने अपराजित राहिला आहे. 1993 मध्ये अर्जेन्टिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांना एकही प्रमुख स्पर्धा जिंकता आलेली नाही. अर्जेन्टिनाची आता उपांत्यपूर्व लढत ब गटात चौथे स्थान मिळविणाऱया इक्वेडोरविरुद्ध शनिवारी होणार आहे. पहिल्या तीन सामन्यात पराभूत होणाऱया बोलिव्हियाचे आव्हान याआधीच संपुष्टात आले होते. अर्जेन्टिनानेही या सामन्यात त्यांना सर्वच विभागात आऊटक्लास केले. तिसऱयाच मिनिटाला अर्जेन्टिनाला आघाडी मिळाली असती. पण बोलिव्हियन गोलरक्षक कार्लोस लॅम्पेने अप्रतिम गोलरक्षण करीत सर्जिओ ऍग्युरो व अँजेल कोरिया यांचे दुहेरी फटके वाया घालविले. मात्र अर्जेन्टिनाला आघाडीसाठी फार वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. सहा मिनिटानंतर मेसीने पुरविलेल्या पासवर पापू गोमेझने जोरदार व्हॉलीवर गोल नेंदवला.
33 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाने ही आघाडी वाढविली. बोलिव्हियाच्या दिएगो बेजारानोने गोमेझला पेनल्टी क्षेत्रात पाडवल्याने अर्जेन्टिनाला पेनल्टी मिळाली. त्यावर मेसीने अचूक गोल नोंदवला. काही वेळानंतर बोलिव्हियानेही आक्रमण केले. पण जेसन चुराचा जोरदार फटका अर्जेन्टिनाचा गोलरक्षक प्रँको अरमानीने सूर मारत परतावून लावला. नंतर मेसीने ऍग्युरोच्या लोफ्टेड पासवर अर्जेन्टिनाची आघाडी 3-0 अशी केली. 60 व्या मिनिटाला चुराने निर्माण केलेल्या चालीवर एर्विन सावेद्राने बोलिव्हियाचा गोल नोंदवला. अर्जेन्टिनाने पाचच मिनिटानी आणखी एका गोलाची भर घातली. बदली खेळाडू लॉटेरो मार्टिनेझने हा गोल करीत मोठा विजय साकार केला.
रिओ डी जानेरो येथे झालेल्या अन्य एका सामन्यात उरुग्वेने पराग्वेचा 1-0 असा पराभव करून अ गटात दुसरे स्थान मिळविले. एडिसन कॅव्हानीने पूर्वार्धात 21 व्या मिनिटाला पेनल्टीवर हा एकमेव गोल नोंदवला. शनिवारी उरुग्वे व कोलंबिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. पराग्वेने गटात तिसरे स्थान मिळविले असून त्यांची लढत शुक्रवारी पेरूविरुद्ध होणार आहे. गट अ मध्ये चौथे स्थान मिळविणाऱया चिलीची लढत शुक्रवारी यजमान ब्राझीलविरुद्ध होणार आहे.