क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर एससी ईस्ट बंगाल आणि ओडिशा एफसी यांच्यात लढत होईल. दोन्ही संघ मोसमाची सांगता विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
दोन्ही संघांसाठी यंदाचा आयएसएल मोसम निराशाजनक ठरला आहे. ओडिशा एफसी अकरा संघांमध्ये तळात आहे, तर ईस्ट बंगालची कामगिरी फार सरस झाली नाही. त्यांचा नववा क्रमांक आहे. यानंतरही सफाईदार विजय मिळाल्यास दिर्घ काळापासून हताश असलेल्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळू शकेल.
रॉबी फाऊलर यांच्या ईस्ट बंगालला चेंडूवरील ताब्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्या संघाला नेहमीच पिछाडीवर पडावे लागले. त्यांच्या आघाडीफळीत ब्राईट एनोबाखरे हा गोल केलेला एकमेव खेळाडू ठरला. गोल नोंदविण्याच्या क्रमवारीत ईस्ट बंगालचा संघ अगदी तळाला आहे. भारतीय स्ट्रायकर्सच्या अपयशाचाही संघाला फटका बसला. जेजे लालपेखलुआ, सी. के. विनीत आणि बलवंत सिंग असे चांगले खेळाडू असूनही ते टार्गेटवर एकाही शॉटची नोंद करू शकले नाही.
ओडिशा एफसी सुद्धा संपूर्ण मोसमात अशाच समस्यांनी त्रस्त राहिला आहे. डायगो मॉरिसियो याचा अपवाद वगळता गोल करण्याच्या बाबतीत एकाही खेळाडूचा पुढाकार नव्हता. संघाने नोंदविलेल्या एकूण गोलांतून अर्ध्याहून अधिक गोल डायगोने केले आहेत. ओडिशाचे प्रशिक्षक स्टीव्हन डायस यांना मात्र आपला संघ चुकांपासून बोध घेण्याचा आणि पुढील मोसमात भक्कम पुनरागमन करण्याचा विश्वास वाटतो. एक मोसम खराब ठरतो तेव्हा त्यातून खूप काही शिकण्याची चांगली संधी मिळते असे डायस म्हणाले. हा मोसम आमच्यासाठी तेवढा चांगला ठरला नाही, पण पुढील मोसमात कामगिरी सरस व्हावी म्हणून आम्ही खूप काही शिकू शकतो, असे ते म्हणाले. ओडिशाची अपयशी मालिका आता दहा सामन्यांपर्यंत लांबली आहे. सर्वाधिक पराभव आणि सर्वांत कमी क्लीन शीट त्यांनी नोंदविल्या आहेत. केवळ स्वाभिमान सोडल्यास बाकी कशासाठीही खेळण्याची संधी नसलेल्या दोन्ही संघांमधील खेळाडू प्रेरणेत कमी पडणार नाहीत, असे डायस यांना वाटते. हा मोसम आमच्याप्रमाणेच ईस्ट बंगालसाठीही चांगला ठरला नाही. ते सुद्धा मोसमाचा शेवट विजयाने करण्यासाठी उत्सुक असतील.