कुडाळ / प्रतिनिधी :
वीज वितरणच्या पोलवरील तुटलेल्या तारेवर पाय पडून हुमगाव येथील 82 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. या वृद्ध महिलेला वाचविण्यासाठी गेलेले तीचे जावईही गंभीर जखमी आहेत. आज सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली.
यशोदाबाई दशरथराव कदम असे मृत वृद्धेचे नाव आहे. तर प्रवीण दत्तात्रय धुमाळ (वय 60) असे गंभीर जखमी जावयाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोदाबाई कदम मूळ रा. कोल्हापूर या गेल्या दोन महिन्यांपासून लेकीच्या घरी हुमगाव येथे वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणेच आज सकाळी घरा पाठीमागील परड्यामध्ये गेल्या असता लगत असणाऱ्या वीज वितरणच्या पोलवरील तुटलेल्या तारेवर त्यांचा पाय पडला. तारेतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वृद्धेला वाचविण्यासाठी आलेले तिचे जावई प्रवीण धुमाळ देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.