केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग यांचे मंत्री सुदिन ढवळीकर यांना आश्वासन
प्रतिनिधी/ पणजी
विजेच्या बाबतीत गोव्याला परिपूर्ण बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय वीज व अक्षय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी दिले आहे.
नवी दिल्ली भेटीवर असलेले वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नुकतीच श्री. सिंग यांची भेट घेऊन राज्यातील विजेसंबंधी विविध समस्यांवर चर्चा केली. त्यावेळी श्री. सिंग यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले.
गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य असल्याने येथे सतत पर्यटकांची गर्दी असते. त्यातूनच राज्यावर अतिरिक्त विजेसाठी मागणी वाढत असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदीचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्यासाठी केंद्राने गोव्याला विशेष महत्त्व दिले पाहिजे, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.
या बैठकीला केंद्रीय वीज सचिव अलोककुमार, वितरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विशाल कपूर, संयुक्त सचिव घनःश्याम प्रसाद, गोव्याचे वीज सचिव व्हाय. राजशेखर, मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडीस आदींची उपस्थिती होती.
सध्या राज्यातील उद्योगांना विजेचा तुटवडा भासत असून भारनियमनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठीच खुल्या बाजारातून वीज खरेदीचा सरकारचा प्रस्ताव असून त्यासाठी केंद्राने राज्यातील वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अतिरिक्त अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी ढवळीकर यांनी यावेळी केली.
राज्याच्या दोन्ही जिह्यात 220 केव्ही उच्च दाबाची वीज उपकेंद्रे उभारण्यात येणार असून त्याशिवाय विद्यमान 220/110 केव्ही उपकेंद्रांचा दर्जा वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात यावा यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली.