पुणे / प्रतिनिधी :
डिझास्टर मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, सायंटिफिक मॉडेल फॉर बेटर फ्युचर, पोल्युशन इटस् इफेक्ट अँड रेमिडीज, ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ अशा विविध संकल्पनांवर आधारित मॉडेल्समधून तिस-या जाधवर सायन्स फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक गमतीजमती जाणून घेतल्या. नवनवीन प्रयोग सादर करताना सर्वच विद्यार्थी विज्ञानाच्या जादूई दुनियेत रमले.
प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, युनिर्व्हसल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘जाधवर सायन्स फेस्टिव्हल २०२०’ या तिसºया राज्यस्तरीय विज्ञान परिषदेचे आयोजन नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, प्रा.प्रविण ठाकूर, प्रा.लक्ष्मण गोगावले आदी उपस्थित होते.
फेस्टिव्हलमधील स्पर्धा शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटात झाली. सायन्स आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत ऑटोमेशन इन अॅग्रीकल्चर, क्लिन अँड ग्रीन इन्व्हार्नमेंट, क्लायमेट क्रायसिस अँड सोल्युशन, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा विविध संकल्पनांवर देखील विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिव्हल २०२०’ या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळावे व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जावा, विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. यामुळे त्यांच्यातील संशोधन वृत्तीस देखील चालना मिळते. विद्यार्थीदशेतच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, याकरीता असे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे. विज्येत्यांना एकूण ४७ हजार रुपयांची पारितोषिके आणि स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.