प्रतिनिधी /मडगाव
‘ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, पांडुरंग’… ‘या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोहिला’… ‘चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी’… या सारख्या भक्ती रचनांनी काल रविवारी मठग्राम नगरी पुन्हा दुमदुमली. मडगावच्या श्री हरि मंदिर देवस्थानच्या दिंडी महोत्सव काल भक्ती भावाने साजरा करण्यात आला. कोरोना महामारी नंतर यंदा दिंडी महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. दिंडी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या देंडी स्पर्धेने दिंडी महोत्सवात भक्तीमय वातावरण निर्माण केलं
दिंडी महोत्सवानिमित्त श्री हरि मंदिरात सकाळी धार्मिक विधी व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. श्रींचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिंडी महोत्सवाला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.
दिंडीला राज्य उत्सवाचा दर्जा
मडगावच्या श्री हरि मंदिर देवस्थानच्या दिंडी महोत्सवाला 113 वर्षे पूर्ण झाली. हा महोत्सव केवळ गोव्यात नव्हे तर शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात देखील लोकप्रिय आहे. दिंडी महोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
दिंडी महोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देताना त्याची घोषणा पर्यटन खाते व कला आणि संस्कृती यांच्या तर्फे केली जाते. या संदर्भात विशेष बैठक घेऊन राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पाठ पुरावा करणे आवश्यक असून मडगावचे आमदार दिगंबर कामत हे आत्ता भाजपमध्ये असल्याने पाठ पुरावा करतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
गायक कलाकारांच्या बैठकी रंगल्या
हरिमंदिरासमोरील व्यासपीठावर ‘पहिली गायनी बैठक’ झाली. या बैठकीत प्राजक्ता काकतकर व अभिजीत काळे यांचे गायन झाले. प्राजक्ता काकतकर यांनी आपल्या गायनाची सुरवात ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ या अभंगाने केली. त्यानंतर ‘मंदारमाला’ नाटकातील ‘सोहम हर डंबरू बाजे’.. हे नाटय़गीत सादर केले. त्यानंतर संगीत मानापमान नाटकातील खरा तो प्रेमा हे नाटय़गीत व त्यानतंर एक भक्ती रचना सादर केली.
अभिजीत काळे यांनी संत नामदेव महाराजाच्या भक्ती रचनेने गायनाला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी भक्ती रचना सादर केल्या. गायनाची दुसरी बैठक न्यू मार्केट परिसरात तर तिसरी बैठक मडगाव नगरपालिकेसमोर झाली.
दिंडी स्पर्धेने भक्तीमय वातावरण
श्री दामबाबाले घोडे कल्चरल असोसिएशने आयोजित केलेल्या दिंडी स्पर्धेने खऱया अर्थाने मठग्राम नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण केले. यंदा ही दिंडी स्पर्धा मडगाव पालिका ते स्टेट बँक ऑफ इंडिया या दरम्यान घेण्यात आली. तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दिंडी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. दिंडी स्पर्धेची सुरवात आमदार दिगंबर कामत यांनी केली. यावेळी दामू नाईक, सुहास कामत, मनोहर बोरकर, दिलीप नाईक तसेच इतरांची उपस्थिती होती.
या दिंडी स्पर्धेत गोव्याच्या विविध भागातून आलेली पथके सहभागी झाली होती. दिंडी स्पर्धेत रिंगण पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पारंपारिक वेशभूषा, टाळ, मृदूग तसेच पखवाज यांच्या तालावर दिंडी पथकातील कलाकारांनी दिंडीचा सुंदर आविष्कार सादर केला.
श्री दामबाबाले घोडे तर्फे आकाश कंदिल स्पर्धाही आयोजित केली होती. तिला ही उदंड असा प्रतिसाद लाभला.
सॉलीड पार्टीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत गोव्यातील कलाकारांनी रांगोळीचा सुंदर नजारा पेश केला होता. दर वर्षी ही रांगोळी स्पर्धा सर्वाचे आकर्षण ठरते. यंदा ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद रांगोळी स्पर्धेला लाभला. नेत्रसुखद रांगोळय़ांनी दिंडी महोत्सवात रंग भरला