एल. के. सरतापे / म्हसवड :
आधुनिक युगातील सावित्रीची लेक बनुन विद्यार्थी हाच केंद्रबिंदू समजून विद्यार्थी घडवण्याचे काम विद्यार्थ्यांच्यामध्ये बसुन त्यांना ज्या पध्दतीने समजते त्या पध्दतीने समजावून सांगणाऱ्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून आदराने सुशिला विजय बनसोडे यांचे नाव घेतले जाते. 16 वर्षांच्या शिक्षकी नोकरीच्या काळात चार आदर्श शिक्षक पटकावणाऱ्या या शैक्षणिक विश्वातील नवदुर्गा आहेत.
कर्मवीर आण्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व शिक्षणाचे माहेरघर म्हणून पाहिले जाणाऱ्या देवापुर गावच्या आदर्श शिक्षिका सुशिला विजय बनसोडे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिडवाघवाडी (ता. माण. जि. सातारा) येथे अध्यापन करतात. त्यांचे वर्ग भेटीवेळी उत्कृष्ठ पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, दर्जेदार अध्यापन, आनंददायी वातावरण, स्वच्छ व सुंदर वर्गसजावट, उत्कृष्ठ शैक्षणिक साहित्य वापर, वर्गात दिसून आलेने वर्गाचा बौध्दिक दर्जा अतिउत्कृष्ठ आहे.
शालेय अंतरंगामध्ये बोलक्या भिंती सुविचार, शैक्षणिक तक्ते, तरंगचित्रे, वर्गसजावट, विविध शैक्षणिक कोपरे इ. बाबी उल्लेखनीय आहेत. शालेय बहिरंगामध्ये बोलका व्हरांडा, थोर नेत्यांची चित्रे, सुविचार, बोधवाक्ये, घोषवाक्ये, सुंदर मोहक बगीचा पहावयास मिळतो. जिल्हा परिषद शाळा दिडवाघवाडी येथील शाळेचे रुपडे गावातील लोकांच्या मदतीने लोकसहभागातून देखती शाळा उभी केली. याठिकाणी 14 नोव्हेंबर 2005 रोजी नोकरीला सुरूवात झाली. 16 वर्षे शिक्षकी क्षेत्रात अल्पावधीत आपली वेगळी प्रतिमा तयार केली. विद्यार्थ्यांना प्रेमाने शिकवण्याची कला अवगत असल्याने त्यांच्या वर्गाची उपस्थिती कधीच कमी झाली नाही व निकालही 100 टक्के लावणे, वारंवार पालक व विद्यार्थी संवाद होत असल्याने पालक वारंवार शाळेला भेट देवून आपल्या पाल्याच्या प्रगतीची चौकशी करतात. नवनवीन उपक्रम शाळेत राबवून पुस्तकी शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा भाग समजून खेळाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या बनसोडे मॅडम.
सुशिला बनसोडे यांना आदर्श गाव किरकसाल गावामध्ये 2017 मध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याबद्दल सिक्कीमचे तत्कालीन राज्यपाल, विद्यमान लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. सन 2018 मध्ये ज्यांना लातुर येथे मानव विकास प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षिका पुरस्कार तत्कलीन मंत्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेब यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. माण तालुका पंचायत समितीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार सन 2013-14 मध्ये मिळाला. कोरोना काळात शालेयस्तरावर उत्तम उत्कृष्ट नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल दिडवाघवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला बनसोडे यांना नवभारत नवराष्ट्रचा 2021 चा आदर्श शिक्षक पुरस्कार उच्च शिक्षण तंत्रशिक्षण मंञी उदय सामंत व तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कोरोना काळात अनेकांना अन्नधान्यरुपी मदतीचा हात दिला तर प्राथमिक आरोग्य केंद्र, व इतर ठिकाणी 2000 हजार मास्क, सॅनिटायझर वाटप केले तर आम्ही म्हसवडकर ग्रुपने उभे केलेल्या कोव्हीड हॉस्पिटलला 12 हजाराची औषधे भेट दिली, तर जनकल्याण कोव्हीडला हि औषधरुपी मदत दिली. पाणवनच्या मुलांच्या आश्रमातही धान्य व खाऊच्या रुपात मदत केली. या कार्यात बनसोडे यांना त्यांचे पती माण तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय बनसोडे यांची मोठी साथ मिळाली.