अजून काही दिवस मीटर उपलब्ध होणार नसल्याची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 8 दिवसांपासून विद्युत मीटरचा तुटवडा भासू लागला आहे. कंपनीकडून मीटर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची परवड सुरू झाली आहे. मीटर मिळण्यासाठी नागरिक रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयात गर्दी करीत आहेत. अजून काही दिवस मीटर मिळणार नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या घरांच्या वास्तुशांतीच्या तारखा ठरल्या आहेत. परंतु मीटर नसल्याने त्यांना त्या पुढे ढकलाव्या लागत आहेत. अपार्टमेंटमधील फ्लॅटचे काम पूर्ण होऊन देखील मीटर नसल्याने ते रखडले जात आहे. ज्यांच्या घरचे मीटर जळाले त्यांनाही मीटर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. थ्रीफेजचे टेंपररी मीटर नसल्याने सर्वच कामे थंडावली आहेत. जोवर कंपनी मीटर उपलब्ध करून देणार नाही तोवर काम सुरू होणार नाही. त्यामुळे मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.
दररोज 200 मीटरची आवश्यकता
बेळगावमध्ये शहरी भागात दररोज 100 तर ग्रामीण भागात 100 अशा 200 मीटरची मागणी असते. हे सर्व मीटर रेल्वेस्थानकासमोरील हेस्कॉम कार्यालयात मिळत असल्याने दररोज विद्युत कंत्राटदार व ग्राहकांची गर्दी होत असते. परंतु मागील काही दिवसांपासून मीटर मिळत नसल्याने चौकशी करून जाणाऱयांची संख्या वाढली आहे. यामुळे नव्या मीटरचे सर्व काम ठप्प झाल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मीटर उपलब्ध केल्यास कामे पूर्ण करण्यास मदत होणार : अमर सरदेसाई
मीटर उपलब्ध होत नसल्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत. मध्यंतर काही मीटर आले होते. परंतु आलेल्या मीटरपेक्षा मागणी मोठय़ा प्रमाणात असल्याने ते कमी पडत आहे. त्यामुळे मीटर उपलब्ध करून दिल्यास रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.