संशयित मूळचे मध्यप्रदेशचे, पाटणे येथील योग केंद्रात होते सुरक्षा रक्षक
प्रतिनिधी / काणकोण
पाटणे-काणकोण येथील एका योग केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेल्या मूळ मध्यप्रदेशातील दोन व्यक्तींना विनापरवाना बंदूक वापरल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याखाली काणकोणच्या पोलिसांनी अटक केली असून ज्या आस्थापनात सदर व्यक्ती कामाला होत्या त्या योग केंद्राच्या मालकाचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर निरीक्षक प्रवीण गावस यांनी उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, महिला उपनिरीक्षक रिफा बार्रेटो, हवालदार गौतम देसाई, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय देसाई, मिलिंद सैल, विदेश गावकर यांच्यासहित हा छापा मारून संशयितांकडून सिंगल बोअरच्या दोन बंदुका आणि 10 काडतुसे ताब्यात घेतली आहेत. संशयितांची नावे कुणाल रामनरेश सिंग आणि वीरेंद्र विजय सिंग अशी असून 6 डिसेंबरपासून सदर व्यक्ती या योग केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होत्या, अशी माहिती गावस यांनी दिली.
फोंडा येथील एक एजन्सी अशा प्रकारचे सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम करत असून कायद्यानुसार बंदूक वापरायची असल्यास सदर व्यक्तीकडे बंदूक वापरण्याचा अधिकृत परवाना असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा परवाना संरक्षण दलात काम केलेल्या निवृत्त सैनिकांकडे असू शकतो आणि त्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी लागते. शिवाय अन्य राज्यातून व्यक्ती आलेली असल्यास स्थानिक पोलीस स्थानकावर त्याची नोंद करणे आवश्यक आहे. असे असताना वरील व्यक्तींकडून नियमभंग झालेला आहे, अशी माहिती गावस यांनी दिली.
काणकोण तालुक्यातील बऱयाच राष्ट्रीयीकृत बँका त्याचप्रमाणे काही हॉटेलांमध्ये सुरक्षा रक्षक आहेत. मात्र एखाद्या योग सेंटरमध्ये बंदूकधारी सुरक्षा रक्षक ठेवण्याचा प्रसंग येतो याचा अर्थ काणकोण तालुक्यातील किनारपट्टी सुरक्षित नाही काय असा सवाल काणकोणच्या ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे आणि धोक्याचा इशाराही दिला आहे.