विनाशाची देवता ही आपल्या नेहमीच्या देवतांसारखी नसून एका ‘अशनी’ (ऍस्ट्रॉईड) ला या शब्दांनी ओळखलं जात आहे. आज शनिवारी हा अशनी पृथ्वीच्या अगदी जवळच्या कक्षेत येणार आहे, असं संशोधकांनी प्रतिपादन केलं आहे. या अशनीची विनाश क्षमता दुसऱया महायुद्धात जपानच्या हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकण्यात आलेल्या अणुबाँबच्या 65 हजार पट अधिक आहे, असाही तज्ञांचा कयास आहे. या अशनीचं नाव ‘अपोफिस’ असं आहे.
पृथ्वीच्या जवळ विशिष्ट कालावधीनंतर येत असलेल्या अशनींपैकी हा सर्वात मोठा असून त्याची रूंदी जवळपास 370 मीटर आहे. आभासी दुर्बिण प्रकल्पाअंतर्गत याचा शोध लागला. आठ वर्षांपूर्वी याचं छायाचित्र घेण्यात संशोकांना यश आलं. त्याचा पृथ्वीला धोका आहे, हे लक्षात आल्यापासूनच त्याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. शनिवारी तो पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ येईल, तेव्हा त्याचं 24 तास व्हिडीओ चित्रण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
काही संशोधक म्हणतात की, तो चुकून माकून पृथ्वीवर आदळलाच तर भूमीवर दीड किलोमीटर व्यासाचा आणि अर्धा किलोमीटर खोलींचा प्रचंड खड्डा पडेल. या धक्क्यातून जीवसृष्टी पूर्णतः नष्ट कदाचित होणार नाही. परंतु, तिची अपरिमित हानी निश्चितच होईल. ती इतकी असेल, की आतासारखी पृथ्वी नंतर कधीही बघावयास मिळणार नाही. मानव प्रजातीसमोर तर नामशेष होण्याचा धोका आहे.
अर्थात, तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता केवळ एक लक्षांश आहे. अर्थात, जवळजवळ नाहीच. तरीही अभ्यासासाठी त्याच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. अनेकदा तो आजवर पृथ्वीजवळ येऊन गेला आहे. पण पृथ्वी भाग्यवान ठरली आहे. यावेळीही तसंच होणार, हे निश्चित मानलं जात आहे.