बेळगाव / प्रतिनिधी
ढगाळ वातावरणाचा शुक्रवारी रात्री विमानसेवेला फटका बसला. विमानाचे लँडींग होताना धावपट्टी मिळत नसल्याने विमान घिरटय़ा घालत राहिले. 5 ते 6 फेऱया मारल्यानंतर धावपट्टी मिळाल्याने विमानाचे बेळगाव विमानतळावर लँडींग करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला. अन्यथा त्यांना इतर विमानतळावर उतरावे लागले असते.
शुक्रवारी सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण असल्याने विमानांना धावपट्टी मिळण्यास बराच उशीर लागत होता. हैदराबाद येथून बेळगावला आलेले विमान रात्री 7.30 च्या सुमारास धावपट्टी शोधत होते. परंतु धावपट्टीच मिळत नसल्याने बराच उशीर बेळगाव शहराच्या भोवताली हे विमान घिरटय़ा घेत राहिले. विमान घिरटय़ा घालत असल्याने शहरातही याची चर्चा सुरू झाली. अर्ध्या तासानंतर 8 च्या सुमारास विमानाला धावपट्टी मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सायंकाळी 8 च्या सुमारास नाशिकवरून एक विमान बेळगावला दाखल झाले. परंतु त्या विमानालाही धावपट्टी मिळत नव्हती. अखेर बऱयाच वेळानंतर हे विमान बेळगाव विमानतळावर उतरले. ढगाळ वातावरणामुळे प्रवाशांना मात्र प्रवासासाठी अधिक काळ घालवावा लागला.