मे महिन्यात बेळगाव विमानतळावरून 492 विमानांची ये-जा : 11,271 प्रवाशांनी केला विमान प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
देशातील एक महत्त्वाचे विमानतळ असणाऱया बेळगाव विमानतळाने लॉकडाऊनच्या काळातही अविरत सेवा सुरू ठेवली होती. यामुळे विमान उड्डाणांमध्ये राज्यात दुसऱया क्रमांकावर बेळगाव विमानतळ आहे. एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या मे महिन्याच्या आकडेवारीनुसार विमान उड्डाणांमध्ये दुसऱया तर प्रवासी संख्येत तिसऱया क्रमांकावर बेळगाव विमानतळ पोहोचले आहे.
मे महिन्यात बेळगाव विमानतळावरून एकूण 492 विमानांची ये-जा होती. तर मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 440 विमानांची ये-जा होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी संख्या काही प्रमाणात कमी असल्याने काही शहरांच्या सेवा थांबविण्यात आल्या होत्या. तरी देखील इतर विमानतळांच्या तुलनेत बेळगावची कामगिरी अव्वल ठरली आहे.
दि. 1 ते 31 मे दरम्यान बेळगावमधून 11,271 प्रवाशांनी विमान प्रवास केला. बेंगळूर व मंगळूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर सर्वाधिक प्रवासी संख्या ही बेळगावमध्ये होती. या काळात दोन मेट्रीक टन कार्गोसेवाही विमानतळावरून देण्यात आली. सध्या इतर शहरांनाही विमानसेवा पूर्ववत होत असल्याने पुढील काळात बेळगाव विमानतळ पुन्हा एकदा 40 हजारांचा टप्पा गाठेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.