वृत्तसंस्था/ लंडन
माजी चॅम्पियन्स अमेरिकेची व्हीनस विल्यम्स व ब्रिटनचा अँडी मरे यांना विम्बल्डन स्पर्धेसाठी वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला आहे.
गुरुवारी 42 व्या वर्षात पदार्पण करणाऱया व्हीनसने कारकिर्दीत सात ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्यापैकी पाच विम्बल्डनमधील आहेत. पण सध्या तिची महिलांच्या जागतिक मानांकनात 103 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या फेब्रुवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिने दुसरी फेरी गाठली होती. त्यानंतर तिने भाग घेतलेल्या एकाही स्पर्धेत तिला दुसरी फेरी गाठता आलेली नाही. ब्रिटनच्या अँडी मरेने 2013 व 2016 मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. पण दुखापतीच्या कारणास्तव बराच काळ टेनिसपासून दूर रहावे लागल्याने त्याची 124 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. पुनरागमनानंतरही त्याला अद्याप सूर गवसला नसल्याचे दिसून आले आहे.