उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर महाविकास आघाडीकडून यावर अद्याप ठोस स्पष्टीकरण आलेलं नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम असताना फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली.
दरम्यान, “मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे, बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या ११ वाजता बोलावलं आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. आता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषता परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसांमधील काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सूचत नसल्याने, अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे. मी निश्चितपणे उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील.” अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार यांची देखील उपस्थिती होती.
गृह खात्यातील पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधी त्यांनी केंद्रात भेटीगाठी घेतल्या होत्या. याआधीच त्यांच्यावर पुणे पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, आता मुंबई पोलिसांनी यामध्ये उडी घेतली आहे.