वार्ताहर/ आबलोली
कोरोनाच्या संकटाशी सामना करत गुहागर तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांना काजुर्ली शाळा क्र.1मधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र संकटातही सकारात्मक दृष्टीकोन ठेवत विलगीकरण कक्षातील चाकरमान्यांनी शाळेच्या किरकोळ डागडुजीसह परिसर स्वच्छ करत एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला.
शाळा सोडल्यानंतर काम-धंद्यानिमित्त मुंबईला गेलेला चाकरमानी जेव्हा सुट्टीत गावी येतो, तेव्हा तो आवर्जून शाळेला भेट देत असतो. मात्र शाळेत काही काम करण्याची संधी त्याला मिळत नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात शाळेने आसरा दिल्याने काजुर्ली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.1मध्ये विलगीकरण कक्षात असलेल्या चाकरमान्यांनी संधीचे सोने केले.
विलगीकरण कक्षातील दामोदर गोणबरे, सुरेश गोणबरे, प्रकाश गोणबरे, श्रीकांत गोणबरे, आकाश गोणबरे, ओंकार मुर्डवकर, अमोल मुर्डवकर, संदेश गुरव, अनंत वेलोंडे, शैलेश वेलोंडे, नंदकुमार गोणबरे, ओंकार साळवी, अनिता मुर्डवकर, सुरेखा गोणबरे, संगीता गोणबरे, सायली वेलोंडे, संजीवनी वेलोंडे आदींनी शाळा परिसराची स्वच्छता केली. तसेच इमारतीची देखभाल-दुरूस्ती, बांधबंदिस्ती, सावलीसाठी मंडप, झाडांना पाणी घालणे, पावसाळ्य़ात नवीन रोपे लावण्यासाठी जागेची तयारी, मोठे दगड उचलून मैदानातील अडथळे दूर करणे अशी कामे केल्याने शाळा स्वच्छ, सुंदर दिसू लागली आहे.
आपल्या पहिल्या शाळेत कधी 14 दिवस राहायला मिळेल याची कल्पनाही केलेली नव्हती. मात्र कोरोना आपत्तीत क्वारंटाईन व्हावे लागल्याने ही संधी मिळाली. रिकामे बसण्यापेक्षा शालेय परिसरात काम करण्याची कल्पना आम्हाला सूचली. ग्रामस्थांनी आवश्यक साहित्य पुरवले आणि एक एक काम पूर्ण होत गेले. यातून चांगले काहीतरी घडल्याचा आनंद मिळत आहे.
– दामोदर गोणबरे, बी.एड.पदवीधारक