वार्ताहर/ शाहूपुरी
सातारा नगरपालिका हद्द वाढीनंतर हद्दीत आलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या हस्तांतरित प्रक्रियेत गती प्राप्त झाली असून पालिकेचा विस्तार वाढणार आहे. प्रशासकीय कामकाज समतोल,
विकासाभिमूख व गतिमान होण्यासाठी प्रशासनाने विलासपूरशाहपुरी येथे पालिकेची नवीन विभागीय कार्यालये सुरु करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर पालिकेचे क्षेत्रफळ वाढणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विलासपूर ग्रामपंचायत व त्या लगतचा संपूर्ण त्रिशंकूभाग, खेड ग्रामपंचायतीचा हायवेच्या पश्चिमेचा संपूर्ण भाग, शाहूपुरी ग्रामपंचायत व वेण्णा नदी पर्यंत करंजे गावांचे गावठाण तर दरे खुर्द ग्रामपंचायत व त्या लगतच्या वसाहतींचा समावेश आहे. सध्या सातारा नगरपालिकेचे प्रशासकीय कार्यालय दत्त मंदिरा माची
पेठेत आहे. प्रशासकीय कामकाजासाठी विलासपूर, शाहूपुरी, दरे खुर्द, जरंडेश्वर नाका व पिरवाडी येथून पालिका मुख्यालयाचे अंतर जवळपास 5 ते 7 कि.मी.आहे. हद्द वाढीत गेलेल्या तीन ही
ग्रामपंचायतींकडे स्वमालकीच्या प्रशस्त इमारती व कर्मचारी आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी पालिकेचे विभागीय कार्यालय ठेवल्यास उपनगरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. तरी प्रशासनाने विलासपूर, शाहपुरी येथे पालिकेची विभागीय कार्यालये सुरु करावीत, आशी मागणी होत आहे.