- शेतकरी बांधवांसह नागरिकांना महावितरणचे आवाहन
ऑनलाईन टीम / पुणे :
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् ॲपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत व्हॉटस् ॲपद्वारे एकूण 293 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 220 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले आहे. उर्वरित 73 तक्रारींमध्ये प्रशासकीय मंजुरीची गरज असल्याने त्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
दरम्यान, ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने सध्या उसतोडणीचे काम वेगाने सुरु आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीजतारांचे घर्षण होऊन किंवा इतर विद्युत कारणांनी ऊसाला आगी लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकरी बांधवांनी वीजयंत्रणा धोकादायक असल्यास त्याची माहिती व्हॉटस् ॲपद्वारे दिल्यास महावितरणकडून तातडीने दुरुस्ती कामे करण्यात येणार आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉटस् ॲप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् ॲपद्वारे माहिती द्यावी.
तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् ॲप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.