डाव्या पक्षांच्या सरकारवर टीकेचा भडिमार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
एफएसआय कार्यकर्ते एशियानेट न्यूज या वृत्तवाहिनाच्या कोची येथील कार्यालयात काही दिवसांपूर्वी शिरले होते. यानंतर आता केरळ पोलिसांनी रविवारी या वृत्तवाहिनीच्या कोझिकोड येथील कार्यालयवर छापा टाकला आहे. डाव्या पक्षाशी संबंधित आमदार पी.व्ही. अन्वर यांच्या तक्रारीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
पिनाराई विजयन सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून माकपकडून एशियानेट न्यूजला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. वृत्तवाहिनीकडून राज्य सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्याने हे होत असल्याचे बोलले जात आहे. या वृत्तवाहिनीने कुख्यात सोने तस्करी रॅकेटच्या आरोपी स्वप्ना सुरेश आणि विजयन सरकारमधील साटंलोटं उघड केले होते.
केरळ पोलीस सध्या एका खोट्या आरोपाप्रकरणी आमच्या कार्यालयावर छापे टाकत आहे. ही कारवाई कोची कार्यालयातील एफएसआयच्या हिंसक कृत्यानंतर करण्यात आली आहे. एशियानेटला धमकाविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल. वृत्तसमूह याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे एशियानेट न्यूजचे अध्यक्ष राजेश कालरा यांनी म्हटले आहे.
केरळमध्ये यापूर्वीही प्रसारमाध्यमांना गप्प करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सत्तेवर असलेले डावे पक्ष याची पुनरावृत्ती करू पाहत आहेत, परंतु प्रसारमाध्यमांच्या विरोधातील अशाप्रकारच्या रणनीतित ते यशस्वी ठरणार नसल्याचे कालरा यांनी म्हटले आहे. एशियानेट ही केरळमधील पहिली खासगी वृत्तवाहिनी आहे.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एफएसआय) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मल्याळी वृत्तवाहिनीच्या कोची येथील कार्यालयात बळजबरीने प्रवेश केला होता. वृत्तवाहिनीकडून नोंद करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर सत्तारुढ माकपची विद्यार्थी संघटना एफएसआयच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.