कुलुपाचे वजन 400 किलो
उत्तरप्रदेशमधील अलीगढ हे कुलुपांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे राहणाऱया एका वृद्ध दांपत्याने तयार केलेल्या कुलुपाची चर्चा सोशल मीडियावर होतेय. अलीगढच्या ज्वालापुरीमध्ये राहणाऱया सत्यप्रकाश यांनी पत्नी रुक्मिणीसोबत मिळून जगातील सर्वात मोठे कुलूप तयार केले असून त्याची लांबी 10 फूट असल्याचे सांगण्यात येतेय. हे कुलूप 400 किलोंचे असून ते 30 किलो वजनाच्या चावीने उघडले जाऊ शकते.
2 लाख रुपये किंमत
दांपत्याने हे विशाल टाळे अयोध्येत उभारल्या जाणाऱया राम मंदिराला समर्पित करण्यासाठी तयार केले आहे. सुमारे 2 लाख रुपयांच्या खर्चाने तयार झालेले हे टाळे निर्माण करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला असून त्यावर रामदरबाराचे चित्र कोरण्यात आले आहे.
कर्ज घेत कुलूपाची निर्मिती
6 इंच रुंदीचे हे टाळे लोखंडी आहे. या कुलूपाकरता 2 चाव्या तयार करण्यात आल्या आहेत. 65 वर्षीय सत्यप्रकाश हे मजुरीवर टाळय़ाची निर्मिती करतात. या कलेला चालना देण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे. तर विशाल कुलूप तयार करण्यासाठी कर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनेक बदल करणार
अयोध्येला पाठविण्यापूर्वी यात अनेक बदल केले जाणार आहे. बॉक्स, लिव्हर इत्यादी पितळेने तयार केले जाईल. टाळय़ावर स्टीलची स्क्रेप शीट लावली जाईल. याकरात पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत सत्यप्रकाश यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.