स्वच्छ भारत 20-20 लिग : दुसऱया तिमाहीत घोडदौड कायम
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 20-20 लिग’मध्ये पहिल्या तिमाहीत वेंगुर्ले न. प. चा देशात नववा आणि आता दुसऱया तिमाहीत देशात प्रथम क्रमांक पटकाविला. आणखी दोन लिग होणार असून वेंगुर्ले न. प. च्या सर्व पदाधिकारी, अधिकारी, स्वच्छता कर्मचारी व नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात यापुढेही असेच सातत्य कायम राखून स्वच्छ भारत सर्वेक्षणात न. प. देशात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
हागणदारीमुक्त शहर म्हणून वेंगुर्ल्याने राज्यात पहिला मान मिळविला. आपण तो कायम ठेवून आपली शान राखूया. वेंगुर्ले शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही गिरप यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वच्छता व पर्यटन संदर्भातील स्लोगन असलेल्या वेंगुर्ले नगरपालिकेच्या कॅलेंडरचे प्रकाशन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या दुसऱया तिमाही लिग मध्ये वेंगुर्ले न. प. चा देशात प्रथम क्रमांक आल्याचे सांगून सर्व पदाधिकारी, अधिकारी व खासकरून स्वच्छता कर्मचारी व स्वच्छतेसाठी सहकार्य करणाऱया नागरिकांचे अभिनंदन केले.
यावेळी स्वच्छतेचा संदेश देणाऱया 2020 च्या कॅलेंडरचे प्रकाशन नगराध्यक्ष गिरप यांच्या हस्ते व उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, विरोधी गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, आत्माराम सोकटे, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शीतल आंगचेकर, साक्षी पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅलेंडर प्रकाशनासाठी सहकार्य करणाऱया जे. जे. आर्ट स्कूलचे प्रा. सुनील नांदोसकर, आशीर्वाद फोटो स्टुडिओचे रवींद्र वारंग, प्रसाद परब, ‘किरात’च्या संपादिका सीमा मराठे यांचा सत्कार करण्यात आला.
सदरची कॅलेंडर शहरातील सर्व कार्यालये, शाळा तसेच शहरातील प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहेत. स्वच्छतेत सातत्य राहावे, यासाठी शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देणारे टी-शर्ट, प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात घडय़ाळ, वृत्तपत्र कार्यालयांना घडय़ाळ कॅलेंडर देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.