28 हजारांचा मुद्देमाल जप्त : वेंगुर्ले पोलिसांची धडक कारवाई
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले तालुक्यात बेकायदेशीररित्या गोवा काजू फेणीची विक्री करीत असलेल्या चार ठिकाणी वेंगुर्ले पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 28 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वेंगुर्ले-दाभोसवाडा येथील भगवान सत्यवान बटवलकर, वेतोरे येथील यशवंत विष्णू कोंडसकर, आजगांव येथील पास्कू जुजे, वेंगुर्ले-भटवाडी येथील रुजाय लॉरेन्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दाभोसवाडा येथील सत्यावान बटवलकर हा संशयित फरारी आहे.
वेंगुर्ले शहरातील दाभोसवाडा येथे गोवा बनावटीच्या 100 लिटर काजू फेणी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना मिळताच उपनिरीक्षक रूपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अच्युत परब, पोलीस कर्मचारी सुरेश पाटील, डी. बी. पालकर, महिला पोलीस कर्मचारी रुपाली वेंगुर्लेकर यांनी धाड टाकली. वेतोरे-कोंडसकरवाडी येथील यशवंत विष्णू कोंडसकर हा वेतोरे तिठा ते झारापरोड या रस्त्यावरील एका काजूच्या झाडाखाली गोवा बनावटीची काजू फेणी विक्री करीत होता. सदर ठिकाणी बीट अंमलदार सचिन सावंत व गौरव परब यांनी धाड टाकून सुमारे 2 हजार किमतीची काजू फेणी जप्त केली. आजगांव-भोमवाडी येथील पास्कू जुजे हे घरालगत सुमारे 1500 रूपयांची काजू फेणी विकत असताना शिरोडा बीटचे ठाणे अंमलदार गजेंद्र भिसे, योगेश वेंगुर्लेकर अजित जाधव या पेलीस पथकाने कारवाई केली. तर शहरातील भटवाडी तोरणेस्टॉप येथीव रूजाय लॉरेन्स अरावूज याच्याकडे सुमारे चार हजार किमतीची गोवा बनावटीची काजू फेणी विक्रीच्या उद्देशाने बाळगली असल्याचे पोलिसांनी धाडीत आढळले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रूपाली गोरड, पोलीस कर्मचारी सुरेश पाटील, महिला पोलीस रुपाली वेंगुर्लेकर व अजय कांडर आदी पोलीस पथकाने पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजण्याच्या कालावधीत केली.
कारवाई सुरूच ठेवावी!
दरम्यान, महाराष्ट्र-गोवा राज्यांना लॉकडाऊन असताना गोव्यातील दारू येतेच कशी व त्याची खुलेआम विक्री होते. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस यंत्रेणेने चोरटय़ा वाहातुकीच्या वाटांवर लक्ष केंद्रीत करून गोवा बनाटीच्या दारुवर कडक कारवाई सुरू केली आहे. वेंगुर्ले पोलिसांनी जशी कारवाई सुरू केली आहे तशीच ती पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.