प्रतिनिधी /मडगाव
वेळसांव ते माजोर्डानजीकच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळी मोठय़ा प्रमाणात तेलाचे काळे गोळे आढळून आले असून यामुळे या भागातील किनारपट्टीवर फिरणे कठीण बनले आहे. अशा प्रकारचे तेलाचे गोळे किनारपट्टीवर अधूनमधून वाहून येणे ही गोव्यातील नित्याचीच बाब आहे. मात्र पावसाळय़ात हे प्रमाण वाढत असते. रविवारी वेळसांव ते माजोर्डा भागात तेलाचे गोळे मोठय़ा प्रमाणात आले होते तसेच दूरवरच्या परिसरात पसरले होते.
किनाऱयावर येणारे लोक तसेच स्थानिक मच्छीमारांना या तेलाच्या गोळय़ांमुळे समस्या भेडसावल्याचे एका स्थानिक पारंपरिक मच्छीमाराने नजरेस आणून दिले. सदर गोळे पादत्राणांना चिकटल्यास ते साफ करण्यासाठी भरपूर खटाटोप करावा लागतो तसेच मच्छीमारांच्या जाळय़ांना लागल्यास जाळी खराब होत असतात, अशी माहिती त्याने दिली.
खोल समुद्रात मोठी जहाजे तेल बाहेर फेकत असतात. त्यांचे गोळे होऊन ते नंतर लाटांबरोबर समुद्रकिनाऱयांवर येत असतात. अशाच प्रकारे वेळसांव ते माजोर्डा भागातील किनाऱयांवर आलेले सदर तेलाचे गोळे काढण्यासाठी पर्यटन खात्याने आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.