साडेतीन लाखाचा ऐवज लंपास
प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहेत. सोमवारी वैभवनगर येथे भरदिवसा एका बंद घराचा पाठिमागील दरवाजा फोडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
वैभवनगर, दुसरा क्रॉस येथील पिरबुखारी महम्मदगौस सय्यद यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत चोरटय़ांनी पाठिमागील दरवाजा फोडून 7 तोळे सोन्याचे दागिने, 5 तोळे चांदी व 60 हजार रुपये रोख रक्कम पळविले आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
पिरबुखारी हे आझमनगर परिसरात विशाल धाबा चालवितात. मिरज येथे त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील बहुतेक जण रविवारी मिरजला गेले आहेत. त्यामुळे घरात मुलगा व ते स्वतः दोघेच राहत होते. सकाळी 10 वाजता घराला कुलूप लावून ते धाब्यावर गेले. 12 वाजण्याच्या सुमारास घरी परतले त्यावेळी त्यांच्या मुलाने दर्शनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. पाठिमागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. शहर व उपनगरांमध्ये वाढत्या चोऱया, घरफोडय़ांमुळे नागरिक धास्तावले आहेत.