ऑनलाईन टीम / जम्मू :
नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कटरा येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त म्हणाले की, या दुर्घटनेत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 20 जण जखमी आहेत. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. या घटनेनंतर माता वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांसाठी 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.