सुनावणी 4 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. सदर सुनावणी दि. 4 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सुनावणी लांबणीवर पडत असल्याने पुन्हा तारीख पे तारीख सुरू असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महापालिका निवडणूक घेण्याच्या दृष्टीने वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले होते. याबाबत नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. मात्र, याच दरम्यान बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत फेरविचार व्हावा, अशी याचिका माजी नगरसेवकांनी धारवाड उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याबाबत नगरविकास खाते आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार निवडणूक आयोगाने आपले म्हणणे मांडले आहे. मात्र, राज्य शासनाकडून तारीख घेण्याचे सत्र सुरू आहे. यापूर्वी दोन आठवडय़ांची मुदत राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आली होती. त्यानंतर दि. 4 मार्च रोजी सुनावणी होणार होती. मात्र, याचिकेचा क्रमांक आला नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे मंगळवारी सुनावणी होती पण सरकारकडून कोणतीच हरकत दाखल करण्यात आली नसल्याने सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी दि. 4 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.