प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण प्रकरणी अतिरिक्त हरकत दाखल करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे केली. त्यामुळे हरकत दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुभा दिली होती. जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होणार होती. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे सुनावणी दोन आठवडय़ांनंतर होणार आहे.
महापालिका वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवून केवळ आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे याबाबत धारवाड उच्च न्यायायलात धाव घेऊन माजी नगरसेवकांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. ही सुनावणी दि. 22 एप्रिल रोजी होणार होती. पण सरकारी वकिलांनी वेळ घेतल्याने सुनावणी झाली नाही. पण कोरोनाचा प्रसार वाढला असून या परिस्थितीत निवडणूक घेणे अशक्मय असल्याची माहिती देण्यात आली. अतिरिक्त हरकत दाखल करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे हरकत दाखल करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती. न्यायालयाला उन्हाळी सुटी असल्याने पुढील सुनावणी जूनच्या पहिल्या आठवडय़ात होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने न्यायालयाचे कामकाज ऑनलाईन सुरू आहे. महत्त्वाच्या दाव्यांवर सुनावणी करण्यात येत आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबतची सुनावणी दोन आठवडय़ांकरिता लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.