आयसीसी टी-20 वर्ल्डकप जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचचे प्रतिपादन
दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या प्रारंभापासूनच सलामीवीर डेव्हिड वॉर्नर धोकादायक ठरेल, असे एकाही प्रतिस्पर्धी संघाला वाटत नव्हते. जवळपास सर्वच संघांनी वॉर्नर बहरात येणार नाही, असे गृहित धरले हेते. पण, वॉर्नरने या साऱया समीकरणांची उलथापालथ केली. एका अर्थाने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, ही प्रतिस्पर्ध्यांची अक्षम्य चूक ठरली, अशा शब्दात ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचने वॉर्नरच्या यशाचा लेखाजोखा मांडला. रविवारी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 गडी राखून फडशा पाडत आयसीसी टी-20 वर्ल्डकप जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर फिंच माध्यमांशी बोलत होता.
आक्रमक, डावखुऱया डेव्हिड वॉर्नरने या विश्वचषक स्पर्धेतील 7 सामन्यात 289 धावांची आतषबाजी केली. स्पर्धेतील सेमीफायनल व फायनल लढतीत त्याचा खेळ विशेष बहरला आणि याच बळावर जेतेपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाने अचानक मुसंडी मारली. वॉर्नरने फायनलमध्ये 38 चेंडूत 53 धावांची आतषबाजी केली. शिवाय, सामनावीर ठरलेल्या मिशेल मार्शसमवेत 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी देखील साकारली. मिशेल मार्श 77 धावांवर नाबाद राहिला.
‘वास्तविक, काही आठवडय़ांपूर्वी या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघ वॉर्नरचा उल्लेख देखील करत नव्हते, त्याचवेळी मला याचे आश्चर्य वाटले होते. पण, नंतर वॉर्नरने आपली ताकद अवघ्या क्रिकेट जगताला दाखवून दिली. निर्णायक नॉकआऊट लढतींमध्ये तो प्रचंड जिद्दीने खेळला आणि ही बाब निश्चितच वाखाणण्याजोगी होती’, असे फिंचने पुढे नमूद केले.
ऍरॉन फिंचने यावेळी फिरकीपटू ऍडम झाम्पाचीही प्रशंसा केली. ‘माझ्या दृष्टीने झाम्पा हा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी आहे. आपल्या भेदक लेगब्रेक गोलंदाजीच्या बळावर त्याने बडे फलंदाज गारद केले. मिशेल मार्शही अगदी समयोचित वेळी बहरात आला. उपांत्य फेरीत त्याने मार्कस स्टोईनिससह दिलेले योगदान अर्थातच निर्णायक ठरले’, याचा त्याने येथे उल्लेख केला.
मी बाद झालो, तोच टर्निंग पॉईंट ठरला- फिंचचा दावा
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम लढतीत मी बाद झाल्यानंतर मिशेल मार्श क्रीझवर आला आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला, असे ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. मार्शची धडाकेबाज फलंदाजी न्यूझीलंड संघावर दडपण निर्माण करणारी ठरली आणि यातून ते अजिबात सावरु शकले नाहीत. नव्या चेंडूवर पॉवर प्लेमधील गोलंदाजी नेहमीच महत्त्वाची असते. पहिल्या 10 षटकात न्यूझीलंडला 57 धावांवर रोखून धरणे लक्षवेधी होते, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
टी-20 फायनलदरम्यान भेटले जुने मित्र….सौरभ गांगुली आणि शोएब अख्तर!
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरील या लढतीदरम्यान पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींची भेट घेतली आणि उभयतांत यावेळी थोडाफार संवादही झाला. शोएब अख्तरने यावेळचे एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. या उभयतांसह माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन देखील तेथे उपस्थित होता.
अन् जेतेपदाच्या जल्लोषात त्यांनी चक्क विकेटकीपरच्या शूजमधून ड्रिंक्स घेतले!
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू वेड व मार्कस स्टोईनिस यांनी पहिलेवहिले टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर चक्क यष्टीरक्षकाच्या शूजमधून ड्रिंक्स घेत आनंद साजरा करत सर्वांनाच धक्का दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममधील व्हीडिओ शेअर केला. या व्हीडिओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले. मॅथ्यू वेड व स्टोईनिस यांनी मात्र कहरच केला. यष्टीरक्षक मॅथ्यू वेडच्या शूजमध्ये ड्रिंक्स ओतून ते पिण्याची आगळीक यावेळी केली गेली. आयसीसीने हा व्हीडिओ ट्वीट केला आणि त्यात प्रश्न केला, how is your monday going?
वॉर्नरकडून मालिकावीर पुरस्कार कुटुंबियांना समर्पित
ऑस्ट्रेलियन डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार आपल्या कुटुंबियांना समर्पित केला. या विश्वचषक स्पर्धेपूर्वी वॉर्नर अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. पण, येथे निर्णायक क्षणी त्याने आपला खेळ उंचावत ऑस्ट्रेलियाला पहिलावहिला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
ऍशेस संघनिवडीत टी-20 मधील कामगिरीचा विचार होणार नाही- बेली
मिशेल मार्शने टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला असला तरी टी-20 वर्ल्डकपमधील कामगिरीचा ऍशेस मालिकेतील संघनिवडीसाठी फारसा विचार होणार नाही, असे ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले. मिशेल मार्शने युएईमधील या स्पर्धेत 62 च्या सरासरीने 185 धावांचे धडाकेबाज योगदान दिले.
‘एका क्रिकेट प्रकारात लक्षवेधी योगदान दिले म्हणून दुसऱया क्रिकेट प्रकारातही तीच अपेक्षा करणे गैर ठरते. विभिन्न क्रिकेट प्रकारात विभिन्न स्थिती असते आणि त्यानुसार आपल्या खेळात लवचिक बदल करावे लागतात. याचमुळे, प्रत्येक क्रिकेट प्रकारात विभिन्न स्पेशालिस्ट खेळाडूंची संघबांधणी महत्त्वाची ठरते’, असे बेली पुढे म्हणाले. मार्शने आजवर 32 कसोटी सामने खेळले. पण, अद्याप तो कसोटी संघात आपले स्थान निश्चित करु शकलेला नाही. मार्शची कसोटीतील सरासरी 25 तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सरासरी 39 च्या घरात राहिली आहे.
मार्श म्हणाला, निवडकर्त्यांचा ‘तो’ निर्णय माझ्या पथ्यावर पडला!
बिग-हिटिंग ऑलराऊंडर व टी-20 वर्ल्डकप जेतेपदातील हिरो मिशेल मार्शने या महत्त्वाच्या स्पर्धेत तिसऱया स्थानी बढती मिळाली, त्या निर्णयाचा आपल्याला उत्तम लाभ घेता आल्याचे यावेळी नमूद केले. 31 वर्षीय मिशेल मार्शने या स्पर्धेतील 6 सामन्यात 61 पेक्षा अधिक सरासरी नोंदवली.
‘6 महिन्यांपूर्वी कोचिंग स्टाफमधून एक जण माझ्याकडे आला आणि त्यांनी मला विश्वचषक स्पर्धेत व मालिकेत तिसऱया स्थानी फलंदाजीला पाठवले जाणार असल्याची कल्पना दिली. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. मायदेशात पर्थ स्कॉर्चर्सकडून असलेला अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा होता. देशाकडून प्रतिनिधित्वाची संधी लाभणे, प्रत्येक खेळाडूचा सन्मान असतो. माझीही भावना यापेक्षा वेगळी नाही. मात्र, मागील 6 आठवडे माझ्यासाठी अतिशय खास होते आणि याबद्दल मी निवडकर्त्यांचा आभारी आहे’, असे मार्श याप्रसंगी म्हणाला.
विल्यम्सन म्हणतो, पराभव निराशाजनक, मात्र हार-जीत खेळाचा अविभाज्य घटक
तिसऱयांदा आयसीसी चषक फायनल गमावणे आमच्यासाठी अर्थातच निराशाजनक होते. मात्र, हार-जीत हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य घटक असतो. ऑस्ट्रेलियाने निर्णायक लढतीत इंचभरही वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही, त्यामुळेच ते आमच्यावर वर्चस्व गाजवू शकले, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन म्हणाला. ‘पूर्ण स्पर्धेत आमची कामगिरी अव्वल दर्जाची होती. मात्र, नॉकआऊटमध्ये काहीही होऊ शकते. संथ स्वरुपाच्या खेळपट्टीचा आम्हाला फटका बसला. पहिल्या 10 षटकात केवळ 57 धावा जमवणे महागडे ठरले’, असे त्याने येथे नमूद केले.
आयसीसीच्या ‘टीम ऑफ टूर्नांमेंट’मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही!
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम खेळाडूंचा एक संघ आयसीसीने जाहीर केला असून आश्चर्य म्हणजे यात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. आयसीसीने या सर्वोत्तम संघात 6 विविध देशातील खेळाडू समाविष्ट केले असून बाबर आझमला कर्णधार घोषित केले. या संघात शाहिन आफ्रिदी बारावा खेळाडू म्हणून समाविष्ट आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध सुपर-12 फेरीतील सामने गमवावे लागल्यानंतर पुढील तिन्ही लढती औपचारिक होत्या. अफगाण, स्कॉटलंड व नामिबियाविरुद्ध तिन्ही सामने भारताने जरुर जिंकले. पण, अफगाणने न्यूझीलंडला नमवणे आवश्यक होते. ते न झाल्याने भारताला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता.
आयसीसीच्या ड्रीम इलेव्हन संघात विजेते ऑस्ट्रेलिया, उपविजेते न्यूझीलंड, उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणारे न्यूझीलंड, पाकिस्तान, तसेच स्पर्धेत सहभागी श्रीलंका, दक्षिण आफ्रिकन संघातील काही खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेतील मालिकावीर डेव्हिड वॉर्नर, लेगस्पिनर ऍडम झाम्पा, सीमर जोश हॅझलवूड या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा यात समावेश आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर, न्यूझीलंडचा डावखुरा स्पीडस्टार ट्रेंट बोल्ट, कर्णधार या नात्याने पाकिस्तानचा बाबर आझम व स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा लंकन स्टार फिरकीपटू वणिंदू हसरंगा यांचीही या संघात वर्णी लागली आहे.
आयसीसीची टीम ऑफ द टूर्नांमेंट
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), जोस बटलर-यष्टीरक्षक (इंग्लंड), बाबर आझम-कर्णधार (पाकिस्तान), चरिथ असलंका (श्रीलंका), एडन मॅरक्रम (द. आफ्रिका), मोईन अली (इंग्लंड), वणिंदू हसरंगा (श्रीलंका), ऍडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया), जोश हॅझलवूड (ऑस्ट्रेलिया), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), ऍनरिच नोर्त्झे (दक्षिण आफ्रिका). बारावा खेळाडू ः शाहिन आफ्रिदी (पाकिस्तान).