आयपीएल 2020 : ग्लेन मॅक्सवेलही उशिराने स्पर्धेत सहभागी होण्याचे संकेत, ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा निश्चित झाल्याचे पडसाद
सिडनी / वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा कर्णधार ऍरॉन फिंच, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पॅट कमिन्स यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे 21 पैकी 12 खेळाडू यंदा आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील काही सामन्यात खेळू शकणार नाहीत, हे शुक्रवारी निश्चित झाले. फिंच व कमिन्स यांच्याशिवाय, डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद), स्टीव्ह स्मिथ (रॉयल्स), ग्लेन मॅक्सवेल (किंग्स इलेव्हन पंजाब), मिशेल मार्श (सनरायजर्स), जोश फिलिप्स, केन रिचर्डसन (आरसीबी), ऍलेक्स कॅरे, मार्कस स्टोईनिस (दिल्ली कॅपिटल्स), जोश हॅझलवूड (चेन्नई सुपरकिंग्स), ऍन्ड्रय़्रू टाय (रॉयल्स) आदी खेळाडूंचा यात समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा निश्चित झाल्यामुळे कोव्हिड-19 चे शिष्टाचार पाळणे आवश्यक असल्याने हा व्यापक फेरबदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ सहायक प्रशिक्षक ऍन्डय़्रू मॅकडोनाल्ड यांना मात्र राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला लवकर रवाना होण्याची परवानगी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा दि. 4 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत खेळवला जाणार असून त्यानंतर 3 दिवसांच्या कालावधीत संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
खेळाडूंची चाचणी विमानतळावरच
आयपीएलसाठी जारी केलेल्या शिष्टाचारानुसार, संघातील खेळाडू एकदा संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर विमानतळावरच कोव्हिड-19 ची चाचणी देतील आणि त्यानंतरच आपल्या हॉटेलकडे रवाना होणार आहेत. प्रत्येक खेळाडूला 7 दिवसांचे हॉटेल क्वारन्टाईन सक्तीचे असेल तर यात आठवडय़ातील पहिल्या, तिसऱया व सहाव्या दिवशी खेळाडूंची चाचणी होईल. या तिन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सरावाला सुरुवात करता येईल. याशिवाय, स्पर्धा सुरु असताना पूर्ण कालावधीत आठवडय़ातील प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडूंची स्वतंत्र चाचणी होणार आहे.
यापूर्वी प्रँचायझींनी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळलेल्या खेळाडूंना क्वारन्टाईनच्या अटीतून सवलत मिळावी, अशी विनंती केली होती. पण, ती प्रारंभिक टप्प्यात स्पष्टपणे फेटाळून लावली गेली आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून याबाबत अद्याप शेवटची नियमावली जारी करणे बाकी आहे.
फक्त मुंबईला फटका नाही
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाल्यानंतरही याचा केवळ मुंबई इंडियन्स प्रँचायझीला अजिबात फटका बसलेला नाही. मुंबईच्या संघात नॅथन काऊल्टर नाईल व ख्रिस लिन या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असला तरी या दौऱयात त्यांचा सहभाग नसेल. त्यामुळे, ते नियोजित वेळेनुसार, मुंबई इंडियन्स संघात दाखल होऊ शकणार आहेत. सर्व आयपीएल संघांमध्ये रॉयल्सचा संघ सर्वप्रथम दि. 20 ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅकडोनाल्डही प्रशिक्षक या नात्याने संघासमवेत असतील. मॅकडोनाल्ड यांना आयपीएल 2020 हंगामापासूनच तीन वर्षासाठी रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले आहे.