मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ : परवान्याची प्रक्रिया सोयिस्कर करा
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, व्यवसाय परवान्याच्या किचकट प्रक्रियेमुळे तो घेण्याकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. मागील पाच वर्षात 4 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी व्यवसाय परवाना नूतनीकरण केला नाही. या व्यावसायिकांनी व्यवसाय परवाना नूतनीकरण करून घेतल्यास महापालिकेला चार कोटीहून अधिक महसूल मिळण्याची शक्मयता आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.
महापालिका प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पपूर्व तयारी बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीवेळी मनपाचा महसूल वाढविण्यासाठी व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची गरज असल्याची माहिती डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली. व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांची धावपळ होते. काही कागदपत्रे नसल्याने व्यवसाय परवाना मिळत नाही. परिणामी शहरात हजारो व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय थाटले आहेत. व्यवसाय परवान्यांच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळू शकतो. त्यामुळे व्यवसाय परवान्याची प्रक्रिया सोयिस्कर करण्यात यावी, अशी सूचना सिटीझन्स कौन्सिलच्यावतीने करण्यात आली.
यावेळी माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ म्हणाले, फक्त नवीन व्यवसाय परवान्यासाठी कागदपत्रे सक्तीची करणे गरजेचे आहे. पण नूतनीकरणासाठी कागदपत्रांची सक्ती करण्यात आल्यामुळे असंख्य व्यावसायिक एकदा व्यवसाय परवाना घेतल्यानंतर नूतनीकरण करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 2014-15 पासून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी व्यवसाय परवाना नूतनीकरण केलेला नाही. त्यामुळे 1 हजार रुपये शुल्काप्रमाणे वर्षाला चार कोटींचे नुकसान महानगरपालिकेला झाले आहे. मागील पाच वर्षात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. चार हजार व्यावसायिकांचे व्यवसाय परवाने नूतनीकरण केल्यास चार कोटींहून अधिक महसूल महापालिकेला मिळू शकतो, अशी माहिती डॉ. डुमगोळ यांनी यावेळी दिली.
सिटीझन्स कौन्सिलची सूचना
एकदा कागदपत्रे सादर करून व्यवसाय परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना नूतनीकरणासाठी कागदपत्रांची सक्ती करू नये, अशी सूचना सिटीझन्स कौन्सिल आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱयांनी केली. नूतनीकरणासाठी कागदपत्रांची सक्ती केली नसल्यास बहुतांश व्यवसाय परवाने नूतनीकरण करून देणे सोयीचे होईल, असे मत मांडण्यात आले. या प्रस्तावाचा विचार करावा आणि मनपाचा महसूल वाढविण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली.