फिशिंग व्हिलेज- 300 तरंगत्या घरांमुळे चालते 450 कुटुंबांची उपजीविका
व्हिएतनामच्या 200 वर्षे जुने फिशिंग व्हिलेज काई बीयो हे सध्या चर्चेत आले आहे. हे गाव कॅट बा बेटावर वसलेले आहे. येथे 300 हून अधिक तरंगत्या घरांमध्ये 450 कुटुंबं राहतात. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत सीफूड फार्मिंगच आहे. पण महामारीमुळे मागील एक वर्षात या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. निर्बंधांमुळे व्हिएतनाममधून माशांसह अन्य सागरी खाद्याची विदेशात फारशी निर्यात होऊ शकलेली नाही.
पण आता मासे आणि खेकडय़ांची मागणी वेगाने वाढली आहे. याचमुळे सीफूड फार्मिंगने वेग पकडला आहे. यातून फिशिंग व्हिलेज समवेत देशभरातील मच्छिमार समुद्राच्या दिशेने परतू लागले आहेत. सर्वकाही सुरळीत राहिल्यास आगामी काळात नुकसानाची भरपाई करता येईल अशी लोकांना अपेक्षा आहे. कोरोना संकटावर वेळीच नियंत्रण मिळविणाऱया देशांमध्ये व्हिएतनामची प्रामुख्याने गणना होते.
31 हजार कोटींची उलाढाल
व्हिएतनामची लोकसंख्या सुमारे 9.80 कोटी आहे. शेकडो बेटांनी घेरलेले असल्याने येथील 30 टक्के लोकसंख्या सीफूड फार्मिंगवरच अवलंबून आहे. व्हिएतनाममध्ये दरवर्षी सीफूड फार्मिंगद्वारे सुमारे 31 हजार कोटी रुपयांचा व्यापार होतो. यातून सुमारे 40 लाख लोकांना दरवर्षी रोजगार मिळत असतो.