पुढील सुनावणी होणार 29 नोव्हेंबरला
प्रतिनिधी /बेळगाव
व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्यावतीने व्हॅक्सिन डेपोमधील झाडांचा बचाव करण्यासाठी कर्नाटकच्या चीफ जस्टीस न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर व्हॅक्सिन डेपोमधील वृक्षतोडी तसेच बेकायदेशीर कामे करण्याच्या विरोधात स्थगिती दिली होती. ती स्थगिती चीफ जस्टीस यांनी कायम ठेवली असून पुढील सुनावणी दि. 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
व्हॅक्सिन डेपो बेळगावचे ऑक्सिजन हब्ब आहे. या व्हॅक्सिन डेपोमुळे टिळकवाडीसह बेळगाव परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. व्हॅक्सिन डेपोमध्ये अनेक वनस्पतींची झाडे आहेत. त्यांचे रक्षण करणे हे बेळगावकरांचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली येथील वनस्पती आणि इतर झाडे तोडण्याचा प्रकार सुरू होता. त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. तरीदेखील येथील झाडांची कत्तल सुरूच होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी त्याविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
बेंगळूर येथील चीफ जस्टीस ऋतुराज अवस्थी आणि न्यायाधीश सचिन मगदूम यांच्यासमोर त्याची सुनावणी सुरू आहे. सोमवारी यावर सुनावणी होणार होती. मात्र, ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. स्थगिती मात्र कायम ठेवली असून आता पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे. जनहित याचिकाकर्त्यांवतीने ऍड. किरण कुलकर्णी आणि ऍड. सतीश बिरादार हे काम पाहात आहेत.
यापूर्वीचे चीफ जस्टीस हे निवृत्त झाल्याने या जनहित याचिकेवर सुनावणीला विलंब होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे करण्याच्या नावाखाली व्हॅक्सिन डेपोतील वनस्पती आणि झाडांची कत्तल होत आहे. हे चुकीचे असून विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही हा लढा देत असल्याचे जनहित याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.