मुलीचा होकार मिळविण्यासाठी अजब प्रथा
पालकांना स्वत:च्या मुलामुलींच्या विवाहाची चिंता सतावत असते. विवाहासंबंधी जगभरात असंख्य प्रथा-परंपरा आहेत. भारतात देखील विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या परंपरांसह विवाहसोहळे पार पडत असतात. जगातील काही देशांमध्ये विवाहाशी निगडित प्रथा अत्यंत विचित्र आहेत. परंतु या प्रथांचे केल्याशिवाय विवाह देखील मान्य होत नाही.
फिजी या देशात विवाहाला मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानले जाते. विवाहाला सर्व नात्यांपेक्षा पवित्र मानले जाते. येथे विवाहासाठी पुरुषाला अजब प्रथेचे पालन करावे लागते. पुरुष जोपर्यंत स्पर्म व्हेलचा दात घेऊन येत नाही तोवर मुलीचे कुटुंबीय विवाहाला होकार दर्शवित नाहीत. स्पर्श व्हेलचा दातच फिजीमध्ये युवक आणि युवतीचे विवाह ठरवत असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
फिजी हा एक छोटासा बेटसदृश देश आहे. या देशात शतकांपासून अनेक प्रथा-परंपरांचे पालन होत आले आहे. याच प्रथेपैकी एक आहे स्पर्म व्हेल माशाचा दात आणणे. विवाहासाठी पुरुषाला व्हेल माशाचा हार गिफ्ट करावा लागतो. पुरुष व्हेल माशाच्या दातांचा हार घेऊन येतो आणि युवतीच्या कुटुंबीयांसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतो. फिजीमध्ये स्पर्म व्हेलच्या दातांना टाबूआ म्हटले जाते. टाबूआचा अर्थ पवित्र असा होतो. एखादा व्यक्ती जेव्हा दुसऱ्याला टाबूआ गिफ्ट करतो तेव्हा तो स्वत:चा समर्पण भाव दाखवत असल्याचे मानले जाते. संबंधित नाते हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याचे तो जाहीर करत असतो.
टाबूआ गिफ्ट केल्यावरच युवतीचे कुटुंबीय विवाहाला होकार दर्शवितात. टाबूआ मिळविणे सोपे नाही. बाजारात याची किंमत अत्यंत अधिक आहे. टाबूआचा दर हजारो डॉलर्समध्ये असू शकतो. 1 किलो दाताची किंमत 80 हजार रुपयांपर्यंत असू शकते. अनेक लोक याला स्वत:ची प्रतिष्ठा मानत व्हेलच्या अनेक दातांचा हार तयार करवून घेतात. तर काही लोक एका धाग्यात केवळ एकच दात ओवून हार तयार करतात.