वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टिकटॉकसाठी फेब्रुवारी सलग दुसरा महिना यशस्वी ठरला आहे. फेब्रुवारीतही टिकटॉकने सर्वाधिक डाउनलोड होणाऱया ऍपप्रकरणी व्हॉट्सऍप आणि फेसबुकला मागे टाकले आहे. जगभरात टिकटॉकचे सर्वाधिक नोंदणीकृत डाउनलोड्स झाले आहेत.
फेबुवारीत अँड्रॉईड आणि आयओएस यांना मिळून टिकटॉक ऍप जगातील सर्वाधिक डाउनलोड होणारे ऍप ठरले आहे. सेंसर टॉवरच्या एका नव्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. डाउनलोड आणि उत्पन्नवृद्धीप्रकरणी टिकटॉकसाठी फेब्रुवारी महिना उत्तम ठरला आहे.
जानेवारी महिन्यात टिकटॉक सर्वाधिक डाउनलोड करणारे नॉनगेम ऍप ठरले होते. सोशल व्हिडिओ ऍपने जानेवारीत स्वतःच्या 104.7 दशलक्ष डाउनलोडच्या विक्रमला मोडीत काढत 112.9 दशलक्षाचा आकडा गाठला आहे. फेब्रुवारीत टिकटॉकचे उत्पन्न 50.4 दशलक्ष डॉलर्स राहिले. मागील वर्षाच्या फेब्रुवारीच्या तुलनेत यात 784.2 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
टिकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते चीनमध्ये असून तेथे ऍप ‘डय़ुइन’ नावाने उपलब्ध आहे. चीनमध्ये वापरकर्त्यांनी सुमारे 46 दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याने उत्पन्न वाढून 91 टक्क्यांवर पोहोचले आहे. चीननंतर अमेरिकेत 3 दशलक्ष डॉलर्स तर ग्रेट ब्रिटनमध्ये 216000 डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत.
भारतातील स्थिती
भारतातही टिकटॉक सर्वाधिक डाउनलोड होणारा ऍप ठरला आहे. टिकटॉकच्या एकूण डाउनलोड्सपैकी 46.6 दशलक्ष भारतातील आहेत. म्हणजेच भारतात याचे 41.3 टक्के वापरकर्ते आहेत. फेब्रुवारीत डाउनलोड्सची संख्याही 64.8 टक्क्यांनी वाढली आहे. ब्राझील हळूहळू भारतासमीप पोहोचू लागला आहे. ब्राझीलमध्ये फेब्रुवारीत 9.7 दशलक्ष डाउनलोड्स झाले आहेत. अमेरिकेत टिकटॉक 6.4 दशलक्षवेळा डाउनलोड करण्यात आला आहे.
विक्रमी घौडदौड
टिकटॉकच्या एकूण डाउनलोड्सची आकडेवारी गुगल प्ले स्टोअर तसेच ऍपल स्टोअरवरून प्राप्त करण्यात आली आहे. चीन आणि अन्य बाजारपेठांमध्ये थर्ड पार्टी डाउनलोड्स सामील नाही. गुगल प्ले स्टोअरवर 93.2 दशलक्ष ऍप इन्स्टॉल झाले तर ऍपल स्टोअरवर हा आकडा 19.7 दशलक्ष आहे. टिकटॉक सादर झाल्यापासून आतापर्यंत 19.7 दशलक्षवेळा तो डाउनलोड करण्यात आला आहे. चालू वर्षात टिकटॉक सर्वाधिक नॉनगेम डाउनलोड करण्याप्रकरणी व्हॉट्सऍपला मागे टाकणार असल्याची अपेक्षा आहे.