वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन-आयडिया पुन्हा एकदा आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढविण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱयांकडून मिळते आहे. मागील नोव्हेंबरमध्ये केलेल्या शुल्क वाढीसंदर्भातील बाजाराचा कल जाणून घेतल्यानंतर दर वाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
या संदर्भात अधिकची माहिती देताना व्होडाफोन आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रविंदर टक्कर यांनी म्हटले आहे, 99 रुपयांचा महिन्यासाठीचा कंपनीचा प्लॅन हा सर्वात किफायतशीर ठरलेला असून 4 जी सेवा वापरकर्त्यांना तो फायदा देणारा ठरला आहे. येणाऱया काळात आम्ही पुन्हा दर वाढ करण्याच्या विचारात आहोत. यावर्षी तर वाढ होईलच पण कदाचित पुढच्या वर्षी 2023लाही शुल्क वाढ करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात शुल्क वाढीनंतरही प्रति ग्राहकाच्या सरासरी महसूलात 5 टक्के घट होऊन ते 115 रुपयांवर आले आहे. कंपनीच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येतही घट होऊन ती 24.72 कोटी इतकी वर्षाअखेर राहिली आहे. जी त्याच्या मागच्या वर्षी 26.98 कोटी होती. सेवा शुल्कात वाढ केल्याचा हा परिणाम आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 7 हजार 230 कोटी रुपयांचा तोटा झेलला आहे.