वृत्तसंस्था/ ढाक्का
कोरोना व्हायरसग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उलपब्ध करून देण्याकरिता बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब अल हसनने 2019 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वापरण्यात आलेल्या आपल्या बॅटचा लिलाव करणार आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळातर्फे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अष्टपैलू शकीब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि क्रिकेटपटू मुश्फीकुर रहिमने 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वापरलेल्या बॅटचा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी लिलाव करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शकीब अल हसनने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 8 सामन्यांत दोन शतके आणि पाच अर्धशतकांसह 86.57 धावांच्या सरासरीने 606 धावा जमविल्या होत्या. या स्पर्धेत बांगलादेशतर्फे सर्वाधिक धावा शकीब अल हसनने नोंदविल्या होत्या. तसेच त्याने 11 बळीं मिळविले होते. शकीब अल हसन फौंडेशनतर्फे या लिलावातून जमा होणारी रक्कम कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिली जाईल असे सांगण्यात आले.