पंतप्रधानांच्या उपस्थितीत 28 रोजी दिमाखदार सोहळा : अमित शहांसह सात राज्यांचे मुख्यमंत्रीही होणार सहभागी
प्रतिनिधी /पणजी
सलग दुसऱयांदा मुख्यमंत्रीपदी निवड झालेले डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारचा शपथविधी आता येत्या सोमवारी दि. 28 मार्च रोजी होणार असल्याचे निश्चित झाले असून डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर होणाऱया दिमाखदार सोहळ्यात ते शपथबद्ध होणार आहेत.
यापूर्वी प्राप्त माहितीनुसार शपथविधी सोहळा 23 ते 25 मार्च दरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातील 23 तारीख नक्कीही झाली होती. परंतु पंतप्रधान आणि अन्य राष्ट्रीय वरिष्ठ नेत्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सोहळा पुढे ढकलावा लागला. आता तो दि. 28 रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती भाजपमधील अधिकृत सुत्रांनी दिली आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता होणाऱया सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी, यांच्यासह भाजपची सत्ता असलेल्या अन्य 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय भाजपचे 20 राष्ट्रीय पदाधिकारी आणि स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते, राज्यभरातील हितचिंतक यांच्या साक्षीने हा सोहळा होणार आहे.
स्टेडियमजवळ बांधणार हॅलिपॅड
या सोहळ्यासाठी पंतप्रधान उपस्थित राहणार हे आधीच निश्चित झाले होते. मात्र त्यांच्या भेटीची तारीख स्पष्ट होत नसल्याने शपथविधी सोहळ किंचित लांबणीवर पडला होता. आता त्याची जय्यत तयारी बांबोळी स्टेडियमच्या परिसरात सुरू झाली असून स्टेडियमजवळ हॅलिपॅडही बांधण्यात येणार आहे.
डॉ. शेटय़ेना पदार्पणातच मंत्रीपदाची लॉटरी
दरम्यान, 25 आमदारांच्या संख्याबळावर सत्तेत येणाऱया डॉ. सावंत यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात प्रथमच विधानसभेत पदार्पण करणारे डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांची वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे. पदार्पणातच मंत्री बनल्यास ते खरोखरच भाग्यवंत ठरणार आहेत. त्याशिवाय अपक्ष आमदार आलेक्स लॉरेन्स यांचाही समावेश होणार आहे. द्वितीय आणि तृतीय स्थानी अनुक्रमे विश्वजित राणे आणि सुदिन ढवळीकर, तसेच रवी नाईक, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई हे अन्य मंत्री असण्याची शक्यता आहे.