हिडकल जलवाहिनी दुरुस्तीसाठी 6 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. तुम्मरगुद्दीजवळ दि. 26 रोजी गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम दि. 6 सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. परिणामी 24 तास पाणीपुरवठय़ासह शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
हिडकल जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. परिणामी पाणीपुरवठा सुरळीत करता येत नाही. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय एलऍण्डटी कंपनीने घेतला आहे. दि. 6 सप्टेंबर रोजी पंपहाऊस परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच त्या दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसह विविध परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच सहकार्य करावे, असे आवाहन राज्य पायाभूत सुविधा विभाग आणि एलऍण्डटी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.