मालवण / प्रतिनिधी -:
शहरातील मकरेबागवाडी येथील ‘त्या’ धोकादायक वळणावरील छोट्या संरक्षक कठड्यावर बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा पर्यटकांची कार अडकली. कार वळणावरील व्हाळीत कोसळली असती तर अपघाताची तिव्रता वाढु शकली असती. कारमधून गुजरात बडोदा येथील केतकर कुटुंबातील आई, वडील आणि मुलगी असे तिघेजण प्रवास करीत होते. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना धीर दिला. कार कठड्यावरून हटविण्यासाठी कणकवलीहून काहींना बोलाविण्यात आले होते. याअगोदर २६ जानेवारी रोजी पुणे येथील पर्यटकांची कार अशाच प्रकारे संरक्षक कठड्याला धडकून अडकून पडली होती.